रत्नागिरी- रत्नागिरीकर जनतेच्या असंतोषाचे कारण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या रखडलेल्या नूतनीकरणाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आक्रमक झाला असून सोमवारी याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, यासाठी जिल्हाभरातून मनसेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नाबाबत मनसे कडून संबधिताना निवेदन देण्यात आले होते मात्र त्यावर अपेक्षित अशी समाधानकारक व ठोस कारवाई न झाल्याने व रत्नागिरीतील आजवरचा अनुभव पाहता निव्वळ घोषणांवर आमचा विश्वास नसल्याने आंदोलन करणे हे क्रमप्राप्त असल्याचे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी सांगितले.
हे आंदोलन सोमवार दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ ते २ या वेळात होणार असून ते मोर्चा स्वरूपाचे असणार आहे.या मोर्चाचा मार्ग नगरपरिषद मुख्यालय पासून सुरवात होत जयस्तंभ मार्गे बसस्थानकाच्या ठिकाणी निषेध व्यक्त करत सांगता असा असेल.या मोर्चाला मनसे नेते अविनाश जाधव,मनसे सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर,मनसे प्रवक्ते योगेश चिले, जिल्हा संपर्क अध्यक्ष मनिष पाथरे, जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.