चिपळूण- चिपळुण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी कोकणातील नमन व जाखडी या लोककलांना राजाश्रय मिळावा, यासाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविला होता. या पार्श्वभूमीवर आता नमन, जाकडी लोककलांना राजाश्रय मिळण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यात गांभीर्याने लक्ष घतले असून लवकर याबाबत बैठक घेऊन हा महत्वाचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
कोकणातील दशावतार वगळता नमन, जाकडी अशा महत्वाच्या लोककलांना राजाश्रय नाही. यामुळे नमन, जाकडी अशी अनेक मंडळे आज लोकांचे मनोरंजन करीत असताना, कोकणातील या लोककला अनेक कलाकार जपत असताना त्यांची अडचण होत आहे. नमन, जाकडी मंडळांना अनुदान मिळत नाही, कलाकारांना कसल्याही प्रकारच्या सुविधा अथवा मानधन मिळत नाही. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी चिपळूण येथे झालेल्या लोककला महोत्सवात नमन, जाकडी या लोककलांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती.
त्यानंतर त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पध्दतीने हा कोकणच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय पावसाळी अधिवेशनात मांडला. त्याला आता मूर्त स्वरुप येण्याची चिन्हे दिसत आहेत. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी आमदार शेखर निकम यांना दि. १५ मे रोजीच्या पत्राने या विषायासंदर्भात उत्तर दिले आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव यांच्याकडे आपण हा विषय कार्यवाहीसाठी पाठविल्याने ना. मुनगंटीवार यांनी कळविले आहे. तसेच या संदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेण्याचे जाहीर केले आहे. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नामुळे कोकणातील नमन, जाकडी लोककलांना अनुदान मिळवण्याचा, राजाश्रय मिळविण्याचा, कलकारांना सुविधा मिळण्याचा मार्ग आता खऱ्या अर्थाने दिसू लागला आहे.