आमदार संजय केळकर ठाण्यात राबवणार ‘नाले दत्तक’ योजना

Spread the love

ठाणे- समस्या, दुर्गंधी आणि भ्रष्टाचाराचे कुरण ही नाल्यांची ओळख आता संपणार असून आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागर फाऊंडेशन’ ही संस्था डॉ.मूस मार्गाजवळ आदर्श नाले बांधणी प्रकल्प आणि नाले दत्तक योजना राबवत आहे. दरवर्षी नालेसफाईमधून होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत आमदार संजय केळकर सातत्याने आवाज उठवत आहेत. याच बरोबर त्यांनी यावर रामबाण उपाय म्हणून आदर्श नाले बांधणी प्रकल्प आणि नाले दत्तक संकल्पना देखील ठाण्यात रुजवली आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली जागर फाऊंडेशन या संस्थेने ठाणे महापालिकेकडे प्रस्ताव दाखल केला आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत तातडीने मंजुरीही दिली. ही योजना लोकसहभागातून राबवण्यात येत असून ठाण्यातील विकासक ‘मे.बोरकर रिअल्टी’ या कामासाठी सहकार्य करत आहेत.

नंदिनी बोरकर-(सारंगधर) यांनी आदर्श आणि आधुनिक पद्धतीच्या नाले बांधणीचा आराखडा तयार केला आहे. सुमारे ९० मिटर लांबीचे आवरण या नाल्यावर चढविण्यात येणार असून दोन्ही बाजूला व्हर्टीकल गार्डन करण्यात येणार आहे. परिसरात मोठा कचरा येणार नाही,अशी बांधणी करण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा येथील दीपक सोसायटी, जीवन शांती सोसायटी आदी संकुले आणि आजूबाजूच्या इमारतींना होणार आहे.

नाले दत्तक योजना ही अन्य ठिकाणीही फायदेशीर ठरणार असून ‘जागर फाऊंडेशन’ प्रमाणे याकामी अन्य संस्था आणि नागरीकांनी पुढे आल्यास, नाले सफाई ही समस्या राहणार नाही. दरवर्षी नाले सफाईतून होणारा भ्रष्टाचार थांबू शकतो. आयुक्तांनी या उपक्रमास तातडीने हिरवा कंदील देऊन दूरदृष्टी दाखवली तर बोरकर रिअल्टीने घेतलेली भूमिकाही कौतुकास्पद आहे,असे आमदार संजय केळकर यांनी भूमिपूजन झाल्यानंतर सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page