
*राजापूर / प्रतिनिधी –* राजापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरू असून महावितरण विभागाच्या विरोधात तालुकावासीयांमध्ये प्रचंड नाराजीची भावना निर्माण झाली आहे. याची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता शासकीय विश्रामगृह येथे महावितरणाच्या समस्यांसदर्भांत बैठक आयोजित केली आहे.
राजापूर तालुक्यात गेले मागील काही दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. मात्र या पावसात वारंवार खंडीत होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे सर्वसामान्य जनता पुरती त्रस्त झाली आहे. राजापूर शहरासह ग्रामीण भागात बहुतांश गावात अनेक वेळा विजपुरवठा खंडीत होत असून तासंतास विज येत नाही अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. जीर्ण झालेले वीजखांब, वीजवाहीन्या वादळी पावसात तुटून पडत असल्याने ग्राहकांना अंधारात रहावे लागत आहे. दरवर्षी ही परिस्थिती ओढवत असतानाही पावसाळ्यापुर्वी महावितरणकडून योग्य ती खबरदारी न घेतली गेल्यानेच ही परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे.
राजापूर तालुक्यात बहुतांश गावात अशी स्थिती असल्याने महावितरण विभागाच्या विरोधात तालुकावासीयांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पाचल परिसरातील जनतेने महावितरणच्या अधिकाऱ्याना धारेवर धरत महावितरणाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर आ.सामंत यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे महावितरणच्या समस्यांसदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला महावितरणाच्या अधिकाऱयांसह ग्राहक, आजी-माजी लोकपतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान या बैठकीपूर्वी दु.3 वा. आ.सामंत राजापूर शहरातील एसटी डेपोसमोरील महामार्गाची पाहणी करणार आहेत. एसटी डेपोसमोर उड्डाण पुलाच्या एका बाजुचे काम व सर्व्हीस रोडचे काम अद्यापही प्रलंबित आहे. तसेच एसटी डेपोसमोर स्थानिक वाहनांना व पादचाऱ्याना ये-जा करण्यासाठी ओव्हरब्रीज व्हावा, अशी देखील स्थानिकांची मागणी आहे. या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आ.सामंत या भागाची पाहणी करणार आहेत.