महिला आयपीएल लवकरच सुरू होत आहे. त्याला वुमन्स प्रीमियर लीग (WPL) असे नाव देण्यात आले आहे. उद्घाटन सत्रापुर्वी भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजची अदानी संघ गुजरात जायंट्सने मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, महिलांची आयपीएल यंदा मार्चमध्ये खेळवली जाऊ शकते.
महिलांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या मितालीने २३ वर्षांच्या कारकिर्दीनंतर गेल्या वर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. संघाची मार्गदर्शक म्हणून, ४० वर्षीय मिताली महिला क्रिकेटला प्रोत्साहन देईल आणि गुजरातमध्ये तळागाळात खेळाचा विकास करण्यास मदत करेल. अहमदाबाद फ्रँचायझी अलीकडेच लिलावादरम्यान पाच संघांपैकी सर्वात महागडे म्हणून उदयास आली, अदानी स्पोर्ट्सलाइनने १२८९ कोटी रुपये खर्च केले.
बीसीसीआयच्या नव्या उपक्रमामुळे महिला क्रिकेटचा झपाट्याने विकास होण्यास मदत होईल आणि युवा खेळाडूंना व्यावसायिकपणे क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे मितालीने म्हटले आहे. मिताली शनिवारी म्हणाली, महिला प्रीमियर लीग हे महिला क्रिकेटसाठी एक उत्तम पाऊल आहे आणि अदानी समूहाच्या सहभागामुळे खेळाला खूप चालना मिळाली आहे.