रत्नागिरी : रत्नागिरीचे युवा नेतृत्व आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्या कामाबद्दल राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्तुतीसुमने उधळली. रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरण कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, आज मी रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलताना म्हटले की दोन मिनीटे अनिकेतवर बोलणार आहे. परवाच टीव्हीवर बातमी बघितली. सिंधुदुर्गमधल्या एका लोकप्रतिनिधीने अनिकेतवर टीका करण्याचा प्रयत्न केला. परंतु एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून काम करण्याचा राजकारणात धंदा बनला आहे. तात्विक भूमिका वेगळ्या असू शकतात. परंतु, आज अनिकेतने या कार्यक्रमाचे जे काही को- ऑर्डिनेशन केले आहे ते बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांपेक्षा व कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांपेक्षाही चांगले आहे. आज रत्नागिरीचा हा तरुण कार्यकर्ता मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय, याचा सार्थ अभिमान मला आहे.
मंत्री सामंत यांनी सांगितले की, मला वाटतं केलेली टीका मनावर घ्यायची गरज नाही. तो को-ऑर्डिनेशन ठेवून महायुती अभेद्य ठेवण्याचा प्रयत्न करतोय, हेच महत्त्वाचे असून महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचे समर्थन केलं पाहिजे. खरं तर अनिकेतवर टीका करून बदनामी करणे म्हणजे रवींद्र चव्हाण यांची बदनामी करण्यासारखे आहे. म्हणून आज मी जाहिरपणे त्याचे कौतुक करतोय. त्याने काल मला किती फोन करावेत, जवळपास ५० ते ६० मेसेज केले. आजचा संक्षिप्त कार्यक्रम कसा असेल, कोणाला काय वाटेल, कसं नियोजन आहे, याचे सूक्ष्म नियोजन त्याने पाठवले. अशा माणसाच्या मागे आपण महायुती म्हणून मागे राहिले पाहिजे. अनिकेतवर टीका करून टार्गेट केले त्याच दिवशी महायुतीने ज्याने टीका केली त्याच्यावर आक्रमण करण्याची गरज होती. मला जे वाटलं ते मी बोललोय, असे मंत्री सामंत म्हणाले.
मंत्री सामंत पुढे म्हणाले की, अनिकेत प्रामणिकपणे काम करतोय. आज तो डोंबिवलीत तुमच्यासोबत काम करतो आहे. आम्ही त्याला सपोर्ट केला पाहिजे.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार बाळ माने, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्यासमवेत महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.