७ मार्च/मुंबई: सार्वजनिक बांधकाम विभागाचे देशाच्या, महाराष्ट्राच्या पायाभूत विकासात उल्लेखनीय योगदान असून या महत्वपूर्ण विभागात काम करण्याची संधी नवनियुक्तांना मिळाली आहे, या संधीचा सन्मान करत आपल्या गुणवत्तापूर्ण कामातुन विभागाची प्रतिमा सर्व नव नियुक्तांनी उंचवावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध संर्वगातील सरळसेवा भरती प्रक्रियेतील पात्र उमेदावारंना मंत्री चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. त्या सोहळ्यात मंत्री चव्हाण बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम विभागात आजपासून नियुक्त झालेल्या नवनियुक्त उमेदवारांना मार्गदर्शन करताना मंत्री चव्हाण म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणारे पायाभूत विकास कामाचे महाष्ट्राच्या प्रगतीला गतिमान करणारे आहे. या विभागाला भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या सारख्या ज्येष्ठ अभियंत्याचा वारसा लाभलेला आहे, तो लक्षात घेऊन नवनियुक्त उमेदवारांनी आपल्या पदाची जबाबदारी समजून घेत त्यात जास्तीत जास्त उत्कृष्ट काम करण्याचा संकल्प आजच्या आपल्या नियुक्तीच्या दिवशी करावा. प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात देशात मोठ्या प्रमाणात गुणवत्ततेच्या निकषावर पदभरती राबवण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाने अतिशय वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने अवघ्या अडीच तीन महिन्यात ही संर्पण पदभरती प्रक्रिया राबवत विभागाची गतिमान कार्यपद्धती अधोरेखित केलेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सर्व नवनियुक्तांनी आपल्या पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी, कारण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामातुन थेट नागरिकांसाठीच्या सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येतात,त्यामुळे देशाच्या नागरिकांसाठी काम करण्याची संधी देणारा हा विभाग आहे, त्यामुळे आपली जबाबदारी देखील मोठी आहे,कारण प्रत्यक्ष क्षेत्रीय ठिकाणी चांगले काम करत विभागाची प्रतिमा अधिक चांगली बनवण्याचे मोठे काम हे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यंत्रणेमार्फत होत असते,त्यामुळे आपण विभागाचे प्रतिनिधित्व करत असता हे लक्षात घेऊन अधिक चांगले काम करण्याचे आवाहन मंत्री चव्हाण यांनी यावेळी केले.