
कणकवली/प्रतिनिधी:- राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे आज वाखरी ते पंढरपूर या मार्गावर संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पायी वारीत सहभागी होत पायी वारी केली. यावेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचे दर्शन घेतले तसेच रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला. आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी खांद्यावर घेत मंत्री नितेश राणे यांनी पायीवारी केली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात विविध भागातून वारकरी भक्ती भावाने सहभागी होत असतात. पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेले हे भक्तगण वारीच्या माध्यमातून आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेत पांडुरंग चरणी लीन होतात. अशा या भक्तीमय वातावरणात या पायी दिंडीत मंत्री नितेश राणे सहभागी झाल्याने वारकऱ्यांमध्येही आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी वारकऱ्यांच्या वतीने मंत्री नीतेश राणे यांचा सत्कारही करण्यात आला.
आषाढी वारी म्हणजे भक्ती आणि संस्कृतीचा दिव्य सोहळा! शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा असलेली ‘आषाढी वारी’ महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी दरवर्षी भक्तिभावात आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’ च्या जयघोषात लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पायी पंढरपूरला येत असतात. हा केवळ एक प्रवास नसून आत्मशुद्धीचा आणि समर्पणाचा सोहळा आहे. यावेळी नितेश राणे यांनी सांगितले.
आज सोलापूर, वाखरी येथे वारीत सहभागी होऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मंत्री नितेश राणे यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सर्व वारकरी बांधवांचा प्रवास सुखाचा होवो अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केली. यावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी बांधवांशी संवाद साधण्याची अनुभूती मिळाली.
भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या या पवित्र क्षणांनी मनात एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली. असे नितेश राणे यांनी सांगितले.