नवी दिल्ली , 03 मे- संगणक युगातील जगप्रसिद्ध कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट ने यापुढे आपली विंडोज १० ही सेवा बंद करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. ही सिस्टीम वापरणारे आता कंपनीच्या पुढील विंडोज ११ या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. ही सेवा त्यांना मोफत मिळणार आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनी नेहमीच त्यांच्या वापरकर्त्यांना विंडोजमध्ये बदल करुन नवीनवीन अपडेट फीचर्स देत असते. नुकतेच या कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, यापुढे विंडोज १० साठी प्रमुख अद्ययावत सॉफ्टवेअर जारी करणार नाही आणि विंडोज १०, २२ एच २ हे शेवटचे अपडेट आहे. मात्र १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या विंडोज १० मध्ये सुरक्षा आणि बग फिक्स अपडेट देत राहणार आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीने जुलै २०१३ मध्ये विंडोज ८.१ आणि ऑगस्ट २०१५ मध्ये विंडोज १० ही सेवा उपलब्ध केली होती. २४ जून २०२१ मध्ये विंडोज ११ हे बाजारात आणले. दरम्यान, आता विंडोज १० च्या वापरकर्त्यांना नियमित सॉफ्ट्वेअर अपडेट करायचे असल्यास ते विंडोज ११ च्या माध्यमातून मोफत मिळणार आहे.