
मिलिंद कडवईकर/कडवई- संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण तपासणीची वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० अशी असून ९.३० झाले तरी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपस्थित नसल्याचे दिसून आले.
बुरंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आसपासच्या आठ दहा गावातील रुग्ण येत असतात.गावातून यायला जायला ठराविक वेळेत गाड्या असल्याने डॉक्टर वेळेत आल्यास रुग्ण वेळेत उपचार घेऊन घरी जाऊ शकतात,परंतु डॉ. रायभोळे हे उपस्थित नसून उपचाराअभावी साधारण वीस ते पंचवीस रुग्ण ताटकळत उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे.

रुग्णांशी संवाद साधला असता त्याचे असे म्हणणे आहे की, ‘जर वेळ पाळता येत नसेल तर वेळेचा फलक लावून काय फायदा.’ पाऊसपाण्याचे दिवस असल्याने शेतीची कामे आटपायची असतात अशा वेळी जर वैद्यकीय अधिकारी वेळेत उपस्थित राहिले तर वेळेत घरी जाता येईल तरी यावर विचार होणे गरजेचे आहे.