मातृमंदिरच्या दुसऱ्या दीपकाडी महोत्सवाचे उत्साहात उदघाटन

Spread the love

संगमेश्वर : दीपकाडी महोत्सव २०२३ चे उदघाटन मातृमंदीरच्या साडवली येथील आय. टी. आय. मध्ये अपूर्व उत्साहात संपन्न झाले. सडेसंवर्धन व कातळशिल्प अभ्यासक सुधीर रिसबूड व फिशरीज कॉलेजचे डॉ. केतन चौधरी यांची प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात साडवली ग्रामपंचायत सरपंच राजेश जाधव, संगमेश्वर तालुका प्रभारी तहसीलदार समर्थ क्षीरसागर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, नायब तहसीलदार आढाव साहेब, पंडित साहेब आदी मान्यवर उपास्थित होते. या प्रसंगी देवरुखमधील निसर्गप्रेमी मंडळी, नवनिर्माण संगमेश्वरचे विद्यार्थी, व शिक्षक, आय. टी. आय चे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

कातळसड्यावर फुलणाऱ्या असंख्य फुलांपैकी देवरुखच्या साडवली सड्यावर फुलणारे महत्वाचे फुल म्हणजे दीपकाडी. मातृमंदिर आय टी आय परिसरात पावसाळ्यातील केवळ १५ ते २० दिवस फुलणाऱ्या या फुलांच्या माध्यमातून एकूण सडेसंवर्धनाची भूमिका पुढील पिढी पर्यंत नेणारा हा उपक्रम.

यप्रसंगी प्रसिद्ध कातळशिल्प अभ्यासक सुधीर रिसबूड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘सड्यापासून आपण संघर्ष आणि सहनशिलता शिकतो. आईच्या प्रेमाने सर्व संकटे झेलत सडे फुलांचे ताटवे फुलवत असतात. म्हणूनच दीपकाडी महोत्सव सारख्या कार्यक्रमातून सड्यांबाबत होत असलेली जाणीवजागृती अतिशय महत्वाची आहे. तंत्रशिक्षणाबरोबरच नवनिर्माणाचे काम देखील हे आय. टी. आय. करत आहे त्यासाठी मातृमंदिर संस्था ही खऱ्या अर्थाने जीवनशिक्षण देणारी शाळा आहे असे मत भाई रिसबूड यांनी मांडले. या महोत्सवला भेट द्यायला आलेल्या नवनिर्माण संगमेश्वरचे विद्यार्थी तसेच इंदिरा फार्मसी कॉलेज च्या विद्यार्थ्यासोबत त्यांनी संवाद केला.

डॉ. केतन चौधरी यांनी विकासाची व्याख्या सांगताना त्यामधील सर्व व्यक्तिमत्त्व आणि दर्जात्मक जीवन या दोन बाबींवर भर दिला. विकासाच्या रेट्यात भरडून निघत असलेला निसर्ग आणि शेवटी आपल्या सगळ्यांना ज्याकडे वळावच लागेल अशा शास्वत विकासाची कल्पना मांडली. पुढील पिढ्यांसाठी संपत्ती राखून ठेवण्यासाठी धडपडणारा माणूस निसर्ग राखण्याबाबत मात्र उदासीन असतो म्हणून दीपकाडी महोत्सवाच्या माध्यमातून सडेसंवर्धनाचे मूलभूत काम होत आहे याचा आनंद आहे असं डॉ चौधरी म्हणाले.

प्रभारी तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांनी , महाराष्ट्रात इतरत्र असलेल्या प्रसिद्ध फुलांच्या पठारावर कमी होत चाललेल्या फुलांच्या संख्येचा उल्लेख करत सद्यस्थितीत सड्यांवरील जैवविविधता जपली पाहिजे असं सांगितलं. मातृमंदिर च्या सडेसंवर्धनाच्या प्रयत्नात फ़ॉरेस्ट, महसूल या विभागाचे सहकार्य राहिल असे उदगार त्यांनी काढले. सामाजिक कार्यकर्ते युयूत्सु आर्ते यांनी मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपाने बिघडलेल्या निसर्गचक्राचे दाखले देत दीपकाडी महोत्सव सारख्या उपक्रमातून याबाबत जागृती होण्यास मदत होते असे सांगितले.

शेवटी अध्यक्षीय भाषण करताना मातृमंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी दीपकाडी महोत्सवाबाबत संस्थेची भूमिका मांडली. मातृमंदिर मधील १७ एकर जागेवरील सड्यावर येणाऱ्या या फुलाच्या व इथल्या एकूणच परिसंस्थेच्या टीकण्याशी केवळ देवरुख, रत्नागिरी नाही तर सार्वत्रिक पर्यावरणाचा संबंध आहे. त्यामुळे आपण करू शकत असलेला प्रयत्न करून सडेसंवर्धनातील आपापला वाटा उचलायला हवा असं त्यांनी सांगितलं. हा महोत्सव यापुढे अधिक मोठ्या प्रमाणावर करून दरवर्षी किमान दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहचेल असा प्रयत्न आम्ही करणार आहोत हे स्पस्ट केले. यासाठी दीपकाडीच्या निमित्ताने मातृमंदिरच्या संरक्षित क्षेत्रात सड्यांची माहिती देणारे कायमस्वरूपी प्रदर्शन विद्यार्थी व पर्यटकंसाठी उभं करण्याचा प्रयत्न संस्था करणार असल्याचे दीपकाडी महोत्सवाची पुढील दिशा स्पस्ट करताना त्यांनी सांगितले. हे करत असताना प्रबोधन – संघटन आणि मग आवश्यकता लागल्यास संघर्ष अशा प्रकारची जाणीव जागृती करण्याचे कामं या महोत्सवाच्या माध्यमातून होईल असे नमूद केले .

मातृमंदिर देवरुख संस्थेने मागील वर्षी कोकणातील पहिला दीपकाडी महोत्सव सुरु केला. सड्यांचे महत्व पुढील पिढीपर्यंत पोहीचवण्याच्या या अभिनव महोत्सवात अनेक शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन सडे समजून घेतले होते.महाराष्ट्रभरातील तज्ञ् मान्यवर यासाठी उपास्थित राहिले होते.कोकणात येत असलेले विनाशकारी प्रकल्प आणण्यासाठी सडे म्हणजे पडीक, टाकावू भुभाग असं सांगितलं जातंय. पण कोकणी माणसाच्या आयुष्यात सड्यांचे स्थान आणि कातळशिल्प, संपन्न जैव विविधता आणि निसर्गचक्रातील महत्वाची भूमिका असलेल्या सड्यांचे महत्व पुढील पिढीपर्यंत जाऊन सडे वाचवायला ही पिढी उभी करण्याचे महत्वाचं काम ‘दीपकाडी महोत्सवाच्या माध्यमातून मातृमंदिर करत आहे. या प्रयत्नात आपण सगळे सामील व्हा.

दीपकाडी महोत्सवात सड्यांवरील फुलांची माहिती व सडेसंवर्धनबाबतच्या लेखाचे प्रदर्शन व छान फुललेल्या दीपकाडी च्या सड्यावरील फेरफटका अशा स्वरूपात हा महोत्सव १५ ऑगस्ट फुले असेपर्यंत पर्यंत सुरु रहाणार आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page