
दापोली : तालुक्यातील जालगाव येथे एका २२ वर्षीय विवाहितेने पती व सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह चौघांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव पिंकीदेवी धर्मेंद्रकुमार धामिन (वय २२) असून, तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला. तिचा भाऊ विरेंद्रकुमार जनार्दन पंडा (वय ३४, रा. बलिया, झारखंड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, पिंकीदेवीला सासरच्या लोकांकडून सतत पैशांची मागणी, शिवीगाळ, धमकी आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता. हा छळ झारखंडमधील नोडीहा गाव व दापोलीतील जालगाव येथे ९ नोव्हेंबर २०२३ ते १३ जून २०२५ या कालावधीत सुरू होता. या त्रासाला कंटाळून पिंकीदेवीने आपले जीवन संपवले, असा आरोप आहे.
या प्रकरणी पती धर्मेंद्रकुमार धामिन, दीर राजेशकुमार धामिन, सासू (नाव अद्याप जाहीर नाही) आणि सासरे रामदेव धामिन यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम १०८, ८५, ११५(२), ३५२, ३५१(१), ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद १६ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.२८ वाजता करण्यात आली. आरोपींपैकी धर्मेंद्रकुमार व राजेशकुमार हे सध्या जालगाव (ता. दापोली) येथे वास्तव्यास आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.