मरीन ड्राईव्ह परिसर पुन्हा चकाचक : आनंद महिंद्रांकडून पालिका कर्मचाऱ्यांचं कौतुक, टीम इंडियाच्या विजयी परेडनंतर 11 हजार किलोंचा कचरा साफ…

Spread the love

मरीन ड्राईव्ह परिसर पुन्हा चकाचक : आनंद महिंद्रांकडून पालिका कर्मचाऱ्यांचं कौतुक, टीम इंडियाच्या विजयी परेडनंतर 11 हजार किलोंचा कचरा साफ…

मरीन ड्राईव्ह ते वानखेडे मैदानापर्यंतच्या विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी मिरवणुकीत असंख्य चाहते सामील झाले. मात्र, मिरवणूक संपल्यानंतर या परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर मुंबई महापालिकेनं कचऱ्याची स्वच्छता करत मरीन ड्राईव्ह परिसर पुन्हा चकाचक केला आहे.

मुंबई : विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची विजयी मिरवणूक देशभर चर्चेचा विषय ठरली. ही ऐतिहासिक मिरवणूक पाहून सर्वजण भारावून गेले. मात्र, या मिरवणुकीनंतर त्या ठिकाणी साचलेल्या कचऱ्याचे फोटोही बाहेर आले. त्यानंतर काही तासांतच मुंबई महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केलेला परिसर सर्वांनी पाहिला. 4 जुलैच्या रात्री मिरवणूक संपल्यानंतर मरीन ड्राइव्ह परिसरात बुटांसह पाण्याच्या बाटल्यांचा ढीग दिसत होता. दुसऱ्या दिवशी साफसफाई करताना या भागातून 11 हजार 500 किलो कचरा उचलण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे.

काय म्हणाले आनंद महिंद्रा :

मिरवणुकीनंतर कचऱ्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. जमलेल्या क्रिकेट चाहत्यांवर काहींनी टीका करण्यास सुरुवात केली. मात्र, उद्योजक आनंद महिंद्रा यांनी या टीकाकारांना प्रत्युत्तर देत बीएमसी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. त्यांनी एका ट्विटला उत्तर दिलं की, मुंबईला जगातील सर्वात मोठं शहर का म्हटलं जातं? याचं उत्तर दिलं आहे. त्यांनी वैभव नावाच्या युजरला उत्तर दिलं आहे. “वैभव मी तुझ्या मताशी सहमत नाही. रस्ता साफ करायला वेळ लागला नाही. कारण बीएमसीची संपूर्ण टीम एकत्र काम करत होती. अर्थात, त्यांना रात्रभर काम करावं लागलं. पण यामुळंच मुंबईला जागतिक दर्जा मिळतो. कारण इथे फक्त पायाभूत सुविधा नाही तर तशी वृत्तीही आहे.” असा मजकूर ट्विट करून त्यांनी बीएमसी कर्मचाऱ्यांसह क्रिकेट चाहत्यांचंही समर्थन केलं.

मरीन ड्राईव्ह परिसरात कचऱ्याचा ढीग ,रात्रभर विशेष स्वच्छता मोहीम :

T20 क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात लाखोंच्या संख्येनं क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. स्वागत सोहळा झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरात रात्रभर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मरीन ड्राईव्ह परिसरात दररोज सकाळी चालण्यासाठी नित्यनेमानं येणाऱ्या मुंबईकरांसाठी हा सर्व परिसर संपूर्ण स्वच्छ स्वरूपात उपलब्ध करुन देण्यात आला. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीनं या स्वच्छता मोहिमेतून दोन मोठे डंपर, पाच लहान जीप भरून अतिरिक्त कचरा संकलित करण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेनं दिली आहे.

संपूर्ण परिसरात स्वच्छता :

मरीन ड्राईव्ह परिसरात दररोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होवू नये, यासाठी मरीन ड्राइव्ह परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार संपूर्ण रात्रभर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं स्वच्छता मोहीम राबवली. रात्री उशिरापर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी थांबलेली गर्दी ओसरु लागताच तातडीनं स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. ए विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या देखरेखीखाली या संपूर्ण परिसरात स्वच्छता करण्यात आली. त्यामुळं पालिकेच्या कर्मचाऱ्यांचं मुंबईकरांनी कौतुक केलं आहे.

कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया :

ए विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सुमारे 100 कामगारांनी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं केलेल्या या स्वच्छता मोहिमेतून एक कॉम्पॅक्टर, एक डंपर कचरा संकलित झाला. त्यासोबतच छोट्या पाच जीप भरून कचरा संकलन करण्यात आला. रात्री सुमारे 11.30 पासून सुरू झालेली ही कार्यवाही सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू होती. या स्वच्छता मोहिमेतून खाद्यपदार्थांचे वेष्टन, पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, यासह बूट, चप्पल, तुटलेल्या अवस्थेतील छत्र्या इतर वस्तू देखील मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आल्या. या संकलित कचाऱ्यापैकी सुमारे 5 जीप भरुन संकलित बूट, चप्पल, इतर पुनर्प्रक्रिया योग्य वस्तू या डम्पिंग यार्डात न पाठवता त्या पुनर्प्रक्रियेसाठी देण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेनं म्हटलं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page