मी पुण्यात पाच वर्षे वास्तव्यास होतो. त्यामुळं मराठी ही माझी आवडती भाषा आहे. मला बोलता येत नसली तरी खूप चांगली समजते असे उद्गार सुप्रसिद्ध टेनिसपटू पद्मश्री रोहन बोपण्णा यांनी काढले. खार जिमखान्याच्या वतीनं आज (8 फेब्रुवारी) त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळेस ते बोलत होते.
मुंबई : सुप्रसिद्ध टेनिसपटू आणि पद्मश्री पदक विजेता रोहन बोपन्ना यांचा आज (8 फेब्रुवारी) मुंबईतील खार येथील खार जिमखानाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी क्रिकेटपटू अमोल मुजुमदार, टेनिसपटू जतीन परांजपे यांच्यासह खार जिमखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
टेनिसपटू जतीन परांजपे काय म्हणाले :
यावेळी आपले मनोगत व्यक्त करत टेनिसपटू जतीन परांजपे म्हणाले की, “खेळाला वयाचं बंधन नसतं हे रोहन बोपन्ना यांनी दाखवून दिलंय. गेल्या महिन्यात त्यानी ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी स्पर्धा वयाच्या 43 व्या वर्षी जिंकून दाखवली आहे. त्यांच्यासोबत मॅथ्यू एबडेन हे ऑस्ट्रेलियन खेळाडू होते. त्यांनी इटलीच्या खेळाडूंना हरवत हा किताब पटकावला होता. त्यामुळं मध्यमवयीन खेळाडूही खूप चांगल्या पद्धतीनं खेळ खेळू शकतात आणि प्रदर्शन करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलंय.”
यावेळी बोलताना क्रिकेटपटू अमोल मुजुमदार यांनी रोहन बोपण्णा यांना शुभेच्छा दिल्या. तसंच पद्मश्री पुरस्काराने त्यांना नुकतच गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या. एखाद्या खेळाडूनं त्याच्या खेळामध्ये सातत्य राखत कसं शिखर गाठावं याचा रोहन वस्तूपाठ असल्याचं अमोल मुजुमदार म्हणाले.
मराठी माझी आवडती भाषा :
खार जिमखानाच्या वतीनं करण्यात आलेल्या या छोटेखानी सत्कार सोहळ्यात बोलत असताना रोहन बोपण्णा म्हणाले की, “मी पुण्यामध्ये पाच वर्षे शिकण्यासाठी होतो. त्यावेळेस माझा मराठी भाषेशी आणि इथल्या संस्कृतीशी खूप जवळून संबंध आला. माझी मराठी भाषा खूप आवडती आहे. मला मराठी बोलता येत नसली तरी खूप चांगल्या पद्धतीनं समजते. मराठी मातीत खार जिमखान्याच्या वतीनं करण्यात आलेला हा सत्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.” यावेळी जिमखानाच्यावतीनं रोहन बोपण्णा यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलं. खार जिमखान्याचे सर्व पदाधिकारी आणि माजी खेळाडू यावेळी आवर्जून उपस्थित होते.