
ठाणे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुलींवरील अत्याचार आणि बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असतानाच दोन दिवसांपूर्वी कळव्यातील एका ९ वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या आईने संशयीत आरोपी सिद्दिकी शेख याच्या विरोधात कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांसमवेत पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांची भेट घेऊन या नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
कळव्यात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या ९ वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग झाल्याची घटना कळवा पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. दोन दिवसांपूर्वी महिलेचे पती नोकरीसाठी बाहेर गेले होते तर ९ वर्षाची मुलगी आणि तिचा १० वर्षाचा भाऊ बाहेर खेळत होते. बालिकेची आई घरात होती. दोन्ही मुले खेळत असताना शेजारी राहत असलेल्या संशयित आरोपी सिद्दिकी शेख याने दोघांना घरी बोलावले. मुलाच्या हातात खेळण्यासाठी मोबाईल दिला तर या बालिकेवर अतिप्रसंग केला. ही घटना १६ मे रोजी घडली होती. त्यानंतर तिने आईला ही घटना घाबरत सांगितली. यानंतर मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संबंधित आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून घेणे गरजेचे आहे समाजातील अशा प्रवृत्तीच्या लोकांना कठोर शासन झालेच पाहिजे अशी मागणी मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी पोलिसांना केली.
राज्यात मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून हे रोखण्यासाठी कायद्याचा वचक आणि अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. पोलिसांनी कळव्यातील या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून आरोपीला गजाआड करून पीडित मुलीला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.