राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती

Spread the love

29 एप्रिल/मुंबई-महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सेवानिवृत्तीनंतर मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक येत्या रविवारी मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. श्री.सौनिक सध्या वित्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी आहेत.

श्री.सौनिक मूळचे बिहारचे असून ते 1987 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी कलकत्ता येथील सेंट झेविअर महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापिठातून आंतरराष्ट्रीय संबंधांवर पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. रायगड, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक, धुळे येथे जिल्हाधिकारीपदी त्यांनी काम केले आहे. अमरावती विभागाचे विभागीय आयुक्तपदी काम केले आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि शेती स्वावलंबन अभियानाचे महासंचालक म्हणून काम केले आहे. नवी दिल्लीतील सेवा कालावधीत ऊर्जा विभाग आणि संरक्षण विभागात काम केले आहे. त्यांना वस्त्रोद्योग, अल्पसंख्यांक, गृह, परिवहन, सार्वजनिक बांधकाम अशा विभागातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page