जालना- मराठा समाजाला त्रास देणाऱ्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पहिल्या खपक्यातच पाडणार, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.
मनोज जरांगे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नेत्यांबाबत भाष्य केले आहे. तसेच यापुढे आम्ही ताकतीने काम करणार असल्याचे सांगितले.
जत्रेला नाही पण नेत्यांना पाडायला जाणार…
यावेळी जरांगे यांनी आंदोलनावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. शिवाय मराठा समाजाला त्रास देत असल्याचा आरोप करत त्यांनी काही नेत्यांना इशारा देखील दिला. मराठ्यांना त्रास देणाऱ्या नेत्यांना निवडणुकीत पहिल्या खपक्याच पाडणार, असे ते म्हणाले. आता जत्रेला जाणार नाही पण नेत्यांना पाडायला जाणार आहे. सरकारने आम्हाला आरक्षण द्यावे. नाही दिलं तर नाईलाजाने आम्हाला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल, असेही जरांगे म्हणाले.
बीड जिल्ह्यातील घटनांवर आवर घालावा…
तसेच ते म्हणाले, ”सरकारने बीड जिल्ह्यातील घटनांवर आवर घालावा, पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावं. सरकारच्या वतीने अजून मला कुणीही भेटायला आलेले नाही. मी माझ्या समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र नेत्यांनी आम्हाला विरोध करणाऱ्यांना शांत राहायला सांगितले पाहिजे”, असे जरांगे म्हणाले. याशिवाय बीडच्या निकालावर बोलतांना जरांगे म्हणाले, ”परळी बंदची हाक, अश्लील स्टेटस हे करायला नको. कुणाचेही स्टेटस ठेऊ नका. निवडणुकीआधी देखील मी हेच सांगितले होते, एखाद्याने स्टेटस टाकले असेल म्हणजे समाजाने टाकले असे नाही”, असे जरांगे म्हणाले आहेत.
मी लढण्यासाठी खंबीर…
याशिवाय त्यांनी समाजालाही आवाहन केले आहे. ”सर्वांनी शेतीची कामे करा. आंतरवालीत येऊ नका, मी लढण्यासाठी खंबीर आहे. मी माझ्या मागण्यांवर ठाम आहे. मराठ्यांच्या मुलांना बीड जिल्ह्यात विनाकारण मारहाण झाली. गेवराई तालुक्यात ही घटना घडली. जातीयवादाच्या नावाखाली ही हाणामारी सुरू आहे. गृहमंत्री आणि बिडच्या पोलिस अधीक्षकांनी या घटनांना आवर घालावा”, असे जरांगे म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उगारले आहे. सगेसोगरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करून सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही जरांगे यांनी उपोषणावर ठाम राहून शनिवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.