मुंबई- राज्य सरकार १५ फेब्रुवारीस विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्यभरातील मराठा बांधवांनी आपआपल्या भागातील मराठा आमदारांना निवेदन देऊन अधिवेशनात आरक्षणाच्या बाजूने बोलायला लावण्यासाठी दबाव वाढवावा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत पवार यांच्या पहिल्या स्मृती कार्यक्रमानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा बांधवांनी निवेदन दिल्यानंतरही आमदारांनी अधिवेशनात आरक्षणाच्या बाजूने बोलले नाहीतर त्यांच्या गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही याच मंचावरून जरांगे यांनी राज्यातील मराठा आमदार, मंत्र्यांना दिला आहे. जरांगे म्हणाले की, ओबीसी समाजामधील आरक्षण मराठा समाजाला देत असतांना सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र सरकारने देण्यास सुरुवात केली आहे. मात्र आतापर्यंत किती प्रमाणपत्र दिली गेली याबाबत सरकार माहिती देत नाही. राज्यात दीड कोटी मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले असेल, असे जरांगे म्हणाले.
या कार्यक्रमात भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत ,अखिल भारतीय जाट महासभेचे जनरल सेक्रेटरी युद्धविर सिंग, पाटीदार संघर्ष समितीचे मनोज पणारा,अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप, आमदार भाई जगताप, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
जो साहेब म्हणेल त्याच्या कानाखाली मारा : जगताप
४०० वर्षानंतर संपूर्ण मराठा समजला एकत्र करण्याचे काम जरांगे पाटील यांनी केले. तुम्ही माणसातील नेते व्हा. साहेब झालात तर बिघडून जाल. तुमच्यावर जे आघात होत आहे. त्याचे कवच देण्यासाठी मराठा महासंघ आपले कवच म्हणून काम करणार असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी सांगितले.