
खेड : कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानक येथे एक प्रवासी महिला रेल्वेत चढत असताना तिच्याकडे असणाऱ्या पर्सची चेन खोलून १ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या मंगळसूत्राची चोरी करून चोरट्याने पोबारा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ जून २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वा.च्या सुमारास खेड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. १ वर घडली. याबाबतची फिर्याद समृद्धी संदेश साळुंखे (वय-२६, रा. तळे मांडवे, ता. खेड, जि. रत्नागिरी, सध्या रा. नायगांव जूचंद्र, पो. चंद्रपाडा, ता. पालघर, जि. वसई) यांनी येथील पोलीस स्थानकात २६ जून रोजी दिली. यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार समृध्दी संदेश साळुंखे या स्वतःच्या पर्समध्ये ४५ ग्रॅम १४० मिली वजनाचे १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे तीनपदरी मंगळसूत्र असलेली पर्स घेऊन रेल्वेमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने पर्सची चेन खोलून या मंगळसूत्राची चोरी केली. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.