
उरण : उरण तालुक्यातील मैथिली पाटील या २४ वर्षांच्या तरुणीचा विमान अपघातात झालेला दुर्दैवी मृत्यू आजही जनतेच्या मनात ताजा आहे. पण त्या काळजाला चिरणाऱ्या घटनेला आज अक्षरशः महिना उलटून गेला आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनांची एकही ठोस अंमलबजावणी न झाल्याने पाटील कुटुंबाच्या दुःखात शासनाच्या दुर्लक्षाची भर पडली आहे.
अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी विविध मंत्र्यांकडून आणि प्रशासनाकडून “ही आमची मुलगी आहे”, “सरकार कुटुंबाच्या पाठीशी आहे” अशा भावनिक घोषणा करण्यात आल्या. प्रसारमाध्यमांतून या वाक्यांचे कव्हरेज झळकत राहिले. काहींनी तर लाखो रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती.
मात्र प्रत्यक्षात एक महिन्यानंतरही पाटील कुटुंबाला एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. उलट, वडील वृद्ध असूनही मजुरीसाठी बाहेर पडत आहेत. आई व आजी यांचे डोळे अजूनही शासनाच्या दिशेने आशेने लागून आहेत. शासनाच्या निष्क्रियतेमुळे हे कुटुंब उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
शासन प्रतिनिधी, स्थानिक आमदार, पालकमंत्री यांचे सांत्वनाचे फोटो, बातम्यांतील उत्सवी वक्ये आणि घोषणांचा आता काहीही उपयोग राहिलेला नाही. पाटील कुटुंबासाठी ती केवळ ढोंगी स्वप्न ठरली आहेत.
लोकशाही व्यवस्थेतील संवेदनशीलतेचा पुरता बोजवारा उडाल्याची भावना आता सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. मैथिलीच्या मृत्यूने फक्त एक अपघात नव्हे, तर सरकारच्या तोंडदेखल्या सहवेदनेचे आणि अशासनाचे भांडाफोडही केला आहे.