
मुख्यमंत्री एखनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपुरात आषाढी वारी 2024 निमित्त भक्तांच्या लाडक्या विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंबीयांना शासकीय महापूजेचा मान मिळाला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा
बाळू अहिरे आणि आशाबाई अहिरे
सोलापूर : पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे संपन्न झाली. त्यांच्या समवेत नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंबीयांना शासकीय महापूजेचा मान मिळाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार पिढ्या एकत्रित पूजेसाठी उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील, मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्राक्ष शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.
अहिरे दाम्पत्य ठरलं मानाचं वारकरी :
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत शासकीय महापूजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे ( वय 55 ) आणि सौ आशाबाई बाळू अहिरे ( वय 50 ) या दाम्पत्याला मिळाला. गेली सोळा वर्षे हे दाम्पत्य पंढरीची वारी करत आहेत. अहिरे दांपत्य हे सटाणा तालुक्यातील अंबासन इथले वारकरी आहेत. त्यांचा शेती हा व्यवसाय आहे. शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकऱ्यांना महामंडळाच्या वतीनं वर्षभरासाठीचा मोफत पास यावेळी देण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विठ्ठलाकडं घातलं ‘हे’ साकडं :
“राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखात राहू दे” असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातलं आहे. शासकीय महापूजेचा मान मिळाल्यामुळे आनंद वाटत असल्याची भावना अहिरे दाम्पत्यानं ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार समाधान आवताडे, यांच्यासह मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते. शासकीय महापूजेनंतर मानाच्या पाच दिंड्यांना निर्मल वारीचा पुरस्कार ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.