अक्षय्य तृतीया : ‘दगडूशेठ’च्या गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य
पुणे- साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला ‘अक्षय्य तृतीया’ हा सण शनिवार २२ एप्रिल रोजी सर्वत्र साजरा केला जात आहे. या दिवशी आंबा या फळाला विशेष महत्व आहे. म्ह्णूनच अक्षय्य तृतीयेचं औचित्य साधून पुण्याच्या दगडूशेठ हलवाईच्या मंदिरात विशेष सजावट करण्यात आली आहे. त्या सजावटीनुसार दगडूशेठ गणपतीला चक्क ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या भोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभा-यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली आहे.
यानिमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गणपती बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवाले याचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला आहे. आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली.
या ११ हजार आंब्यांचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.