मा. आम. जाधव साहेब, ‘जलजीवन मिशन’ कार्यक्रमाची जिल्ह्यात आखणी होत असताना आपण नेमके काय करत होतात?

Spread the love

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले आपले चिरंजीव जल व्यवस्थापन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष होते याचा विसर पडला की काय? – प्रमोद अधटरावांनी वस्तुस्थिती मांडत सरकारवरील आरोप फेटाळले.

जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | सप्टेंबर १३, २०२३.

“कोकणातील अनुभवी आणि कुशल राजकीय नेत्यांपैकी एक म्हणून आजही आपल्याकडे आदराने पाहिले जाते. मात्र उद्धवजी ठाकरे यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपण ज्या पद्धतीने भाजपा नेत्यांवर राळ उडवत आहात ती सहन करण्यापलीकडे आहे. त्यामुळे जाधव साहेब, एक लोकप्रतिनिधी म्हणून आपले अपयश सरकारच्या माथी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न निदान आता तरी थांबवा. ‘जलजीवन मिशन’ ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून अवघ्या देशभरातील माता-भगिनींना डोक्यावरून हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये हा उदात्त हेतू यामध्ये अंतर्भूत आहे. जाधव साहेब, राजकारण एका जागी ठेवायचे असते आणि समाजकारण दुसऱ्या ठिकाणी हा वसा तुमच्या पिढीतल्या कित्येक भवदीय नेत्यांनी आजपर्यंत जपला. मात्र आज आत्ममग्नतेच्या आहारी गेलेले आपण कोणतेही विधिनिषेध पाळताना दृष्टीस पडत नाही. साहेब नैतिक अधःपतन यालाच म्हणत असावेत बहुधा.” अशा संयमित शब्दांत भाजपा नेते, चिपळूण-संगमेश्वर विधानसभेचे निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या विधानांचा समाचार घेतला.

“आमदार साहेब, आपण लोकप्रतिनिधी आहात. जिल्ह्यात अथवा आपल्या मतदारसंघात होणाऱ्या योजनांसाठी आपण नैतिकदृष्ट्या उत्तरदायी असता. त्यातच आपले चिरंजीव मा. जि.प. अध्यक्ष मा. विक्रांतजी जाधव हे जल व्यवस्थापन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष होते. त्यामुळे या विभागात कामांचा बोजवारा उडाला आहे असे आपण जे विधान केले त्याला खुद्द विक्रांत जाधव जबाबदार आहेत हे नाकारून चालणार नाही. वडील आमदार असताना विक्रांत जाधव कोणाच्या दबावाखाली येऊन काम करतील अशी शक्यताही नाही. त्यामुळे ज्या निविदा काढल्या गेल्या त्याला विक्रांत जाधव यांची संमती होती असेच स्पष्ट होते. आता त्यावेळी ज्या कंत्राटदारांना लाभ झाला त्यांची आजही चौकशी करावी ही आम्हीही पक्षाच्या वतीने मागणी करतोच आहोत. चौकशीअंती ‘दुध का दुध और पानी का पानी’ होईलच. साहेब, ज्या हेतूने केंद्र सरकारने योजना कार्यान्वित केली, स्वातंत्र्यानंतर एवढा भरभक्कम निधी गुहागर तालुक्यात, रत्नागिरी जिल्ह्यात आल्याचे कोणी पाहिलेले नाही त्यामुळे या प्रकल्पाचे परीसंचालन करण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकार व स्थानिक जि.प.ची होती. आज हा जो काही बोजवारा उडाला आहे; हा केवळ बोजवारा नव्हे तर नैतिकतेच्या निकषांवर गुन्हा आहे. तब्बल काही‘शे’ कोटी रुपये जर पाण्यात जात असतील तर या गुन्ह्याची दाहकता ‘सदोष मनुष्यवध’ इतकी भयंकर आहे. न्यायालयीन प्रक्रियेत जरी कोणी दोषी दिसत नसले तरीही महाविकास आघाडीला जनतेचे न्यायालय कधीही माफ करणार नाही हे पक्के ध्यानात ठेवा. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना, जिह्यातील पाचही आमदार महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना, जि.प. एकतर्फी ताब्यात असताना कंत्राटदार कोण्या दुसऱ्या पक्षाचे अनुयायी असतील असा आपला आरोप असेल तर आपण पुरस्कारास पात्र आहात.” अशा शेलक्या शब्दांत अधटराव यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर प्रतिहल्ला चढवला.

“गुहागर तालुक्यातील १०५ योजनांसाठी तब्बल १७५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देणाऱ्या आणि लोकांची तहान भागवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला भक्कम आधार देणाऱ्या केंद्र शासनाचे ऋण व्यक्त करणे राहिले बाजूला याउलट निव्वळ राजकारण करण्याचा प्रयत्न चालू असताना प्रशासनाचे अधिकारी बघ्याची भूमिका घेतात याचेही आश्चर्य आहे. प्रशासनाच्या ‘ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी’ या वृत्तीमुळेच कोकणचा म्हणावा तसा विकास झाला नाही. जेवढे स्थानिक राजकारणी कोकणी माणसाच्या स्थलांतराला जबाबदार आहेत तेवढेच प्रशासनाचे अधिकारीही. त्यामुळे यापुढील काळात प्रशासनाने तरी योग्य गोष्टी आमसभेत मांडण्याचे धारिष्ट्य दाखवावे.” असे म्हणत अधटरावांनी प्रशासनिक अधिकाऱ्यांचीही चांगलीच कानउघडणी केली आहे.

ते पुढे म्हणाले, “राज्य सरकार ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला आश्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधी पक्ष हा शासनाचा अविभाज्य घटक आहे. शासनावर अंकुश ठेवण्यासोबत शासनाची निती आणि धोरणे स्थानिक पातळीवर तळागाळापर्यंत व्यवस्थितपणे पोचवणे आणि त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे हे आमदार म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. अशा कार्यक्रमांना ‘बोंबाबोंब आणि भंपकपणा’ असे उपरोधिकपणे संबोधणे हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. आज शासनाने कोकणच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. एक जबाबदार लोकप्रतिनिधी लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी आग्रही राहतो. मात्र आपण केवळ आपले महत्त्व वाढवण्यात मश्गुल आहात. महायुतीचा भाग होता न आल्याचा त्रागा आपल्या दैनंदिन वर्तनात स्पष्ट दिसून येतो.”

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page