नेरळ नळपाणी योजनेचे जलकुंभ आमच्या जागेत बांधू नये — स्थानिकांनी घातला गोंधळ
संभाव्य गोंधळ लक्षात घेवून एसआरपी तैनात
नेरळ: सुमित सुनिल क्षीरसागर
नेरळ साठी 40कोटींची वाढीव नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे.या नळपाणी योजनेचे मुख्य जलकुंभ आमच्या जागेत बांधू नये या मागणी साठी स्थानिकांनी दोन आमदारांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला.मात्र गुप्तचर यंत्रणेच्या माहिती वरून संभाव्य धोका लक्षात घेवून भूमिपूजन स्थळी नेरळ पोलीस आणि राज्य पोलिसांनी एसआरपी पोलिसांची फौज तैनात होती.
काल जीवन मिशन मधून नेरळ वाढीव नळपाणी योजना मंजूर झाली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या 40 कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनेचे आज 23 एप्रिल रोजी भूमिपूजन आयोजित केले होते.नेरळ येथील मोहाची वाडी येथील टेकडीवर जुन्या नळपाणी योजनेच्या जलकुंभ असलेल्या ठिकाणी नवीन पाणी योजनेचे जलकुंभ उभारले जाणार आहे.ते जलकुंभ तेथील होळीच्या माळावर बांधले जाणार असल्याची माहिती स्थानिक आदिवासी रहिवाशी यांना मिळाली होती.त्यामुळे स्थानिक रहिवाशी यांनी भूमिपूजन कार्यक्रम असलेल्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.कार्यक्रम स्थळी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमोर स्थानिकांनी जलकुंभ अन्य ठिकाणी बांधावे अशी मागणी केली. स्थानिकांनी यावेळी आमदार थोरवे यांच्यापुढे आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला.त्यात नवीन जुन्या नळपाणी योजनेचे जलकुंभ असलेले ठिकाण देखील आमच्या सातबारा उताऱ्यावरील जागा असल्याचा दावा स्थानिक अरुण पवार यांनी केला.त्याचवेळी नवीन जलकुंभ बांधण्यात येणार आहे ती जमीन आमच्या होळी उत्सवाची जमीन आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत जलकुंभ बांधू देणार नाही असा आक्रमक पवित्रा आदिवासी रहिवाशी यांनी घेतला.स्थानिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे तेथे भूमिपूजन सोहळा होणार की नाही?याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.शेवटी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आम्ही जमिनीची मोजणी करून घेवू आणि त्यानंतरच जलकुंभ बांधण्याचे काम केले जाईल असे आश्वासन दिले.नेरळ ग्रामपचायतीतर्फे तातडीची मोजणी आणण्यात यावी अशी सूचना त्यांनी उपसरपंच मंगेश म्हसकर यांना केली.
तर आमदार महेंद्र थोरवे यांनी आपला काहीतरी गैरसमज झाला असून नवीन नळपाणी योजनेचे जलकुंभ हे सध्या असलेल्या जलकुंभ बाजूला बांधण्यात येणार असल्याचे जाहीर केले.त्याचवेळी तेथे असलेल्या जमिनीतील पाण्याची टाकी असलेली जमीन ही नेरळ ग्रामपंचायत चे नावे असल्याने तुमच्या होळीच्या माळाला कोणताही धोका पोहचणार नाही असे स्पष्ट आश्वासन दिले.मात्र गेली दोन दिवस त्या भागातील स्थानिक रहिवाशी यांच्याकडून आंदोलन करण्याची घेतली गेलेली भूमिका लक्षात घेवून आदिवासी समाजाचे लोक कायदा हातात घेण्याची शक्यता निर्माण झाली होती.त्यामुळे नेरळ पोलिसांची फौज आणि सोबत राज्य राखीव दलाची एसआरपी ची पलटून नेरळ मोहाची वाडी येथे तैनात होती.