
चिपळूण: चिपळूण शहरातील एक मनमिळावू, अजातशत्रू आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या लायन अनिल बाळकृष्ण देसाई (वय ६५) यांचे शनिवारी रात्री पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी चिपळूण सोडून पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या निधनाने चिपळूणच्या औद्योगिक, सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मूळचे लोणावळ्याचे असलेल्या अनिल देसाई यांनी १९८४ साली चिपळूणमध्ये येत खडपोली एमआयडीसीमध्ये ‘प्राईम केमिकल्स’ या नावाने स्वतःची कंपनी सुरू केली. तब्बल वीस वर्षे यशस्वीपणे उद्योग चालविल्यानंतर, १९९८ मध्ये संगमेश्वर येथील उदय लोध यांच्यासोबत ‘समर्थ असोसिएशन’ या नावाने भागीदारी व्यवसाय सुरू केला. २००६ पर्यंत त्यांचा हा व्यवसाय भरभराटीने सुरू होता.
त्यांचे व्यावसायिक सहकारी उदय लोध सांगतात, “अनिलजी हे दिलखुलास, स्पष्टवक्ते आणि अन्यायाविरोधात नेहमी ठामपणे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच आमची मैत्री इतकी घट्ट होती.”
उद्योग क्षेत्राबरोबरच लायन अनिल देसाई हे समाजसेवेतही अग्रणी होते. १९८७ पासून ते लायन्स क्लबचे सदस्य होते. अनेक पदांवर काम करत त्यांनी क्लबला नवे आयाम दिले. २०११ मध्ये ‘मल्टिपल कौन्सिल चेअरमन’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. बेस्ट चेअरमन, बेस्ट रिजन चेअरमन, इंटरनॅशनल प्रेसिडेंट अवॉर्ड, इंटरनॅशनल अॅप्रिसिएशन अवॉर्ड अशा विविध गौरवांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय लायन्स परिषदा आणि कार्यक्रमांमध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
चिपळूण न्याब संघटना, कोकण युथ असोसिएशन, सेंट्रल एक्साईज आणि कस्टम, डिबीजे कॉलेज, चिपळूण स्पोर्ट्स असोसिएशन, रत्नागिरी इंडस्ट्रियल असोसिएशन अशा अनेक संस्थांच्या स्थापनेत आणि विस्तारात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
खेळांमध्येही ते रुची ठेवणारे होते. बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या क्रीडाक्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांच्या पश्चात पत्नी विद्या, मुलगी डॉ. अंकीता (एमबीबीएस) आणि शंभर वर्षीय वडील असा परिवार आहे. रविवारी पुणे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.