
आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच सकाळी चहासोबत ब्रेड खायला आवडतं, अनेकदा आपण बाहेर खरेदीला गेलो की आठवणीने ब्रेडचे पॅकेट खरेदी करतो. ब्रेडचे वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार ब्रेड खरेदी करत असतात. पण तुम्ही खात असलेल्या ब्रेडच्या पॅकेटमधील पहिला आणि शेवटचा ब्रेड इतर ब्रेडपेक्षा वेगळा का असतो? असा प्रश्न तुम्हाला कधी ना कधी पडला असेल यात शंका नाही. आज आम्ही तुम्हाला पहिला आणि शेवटचा ब्रेड वेगवेगळे दिसण्यामागचं कारण सांगणार आहोत. शिवाय ते ब्रेड खायचे की नाही याबाबतहची माहिती सांगणार आहोत.
ब्रेड पॅकेटच्या वरच्या बाजूला असणारा ब्रेड हा आतील इतर ब्रेडपेक्षा दिसायला वेगळा असतो हे तुम्ही पाहिलं असेलच. शिवाय या ब्रेडच्या विचित्र आकारामुळे अनेकजण तो ब्रेड खाण्याऐवजी टाकून देणं पसंत करतात. पण या ब्रेडचा आकार वेगळा का असतो ते जाणून घेऊया. ब्रेडचे वेगवेगळे आाकार असण्याचं प्रमुख कारण म्हणजे, ब्रेड बनवण्याची प्रक्रिया.
ब्रेड बनवताना ते एका मोठ्या आकाराच्या साच्यात बनवले जातात आणि नंतर त्याचे पातळ तुकडे किंवा काप केले जातात. त्यानंतर जेव्हा ब्रेड बेक केला जातो, त्यावेळी ब्रेडचा बाहेरील भाग, जो ब्रेड तयार करण्याच्या साच्याच्या संपर्कात येतो, तेव्हा तो आतील भागाच्या तुलनेत किंचित कडक बनतो. ब्रेडचे पातळ तुकडे करत असताना शेवटच्या ब्रेडचा तो भाग जो साच्याच्या संपर्कात आलेला असतो तो वरच्या आणि खालच्या ब्रेडमध्ये येतो आणि तो पॅकेटमध्ये पॅक केला जातो. त्यामुळे तो आतील इतर भागांसारखा पांढरा किंवा एकसारखा न दिसता थोडा वेगळा आणि कडक दिसतो.
महत्वाची बाब म्हणजे, हे कडक ब्रेड खाली असलेल्या ब्रेड स्लाइसचे रक्षण करतात. कडक ब्रेड ओलावा शोषून बुरशीपासून आतील ब्रेडचे रक्षण करतात. त्यामुळे अनेक लोक जरी या ब्रेडच्या पॅकेटमधील सर्वात वरचा (पहिला) आणि सर्वात शेवटचा ब्रेड खात नसतील, तर त्यांनी तसं न करता ते ब्रेड खायला हवेत. कारण, या तुकड्यांमध्ये इतर ब्रेडच्या तुलनेत जास्त फायबर घटक असतात. फायबरचे तत्व जास्त असतात त्यामुळे तुम्ही ते ब्रेड खाऊ शकता. शिवाय फायबर जास्त असल्याने तुम्ही मुलांसाठी याच्या वेगवेगळ्या डिशेशही बनवू शकता.