
नेरळ: सुमित क्षीरसागर … कर्जत तालुक्याचे टोक असलेल्या खांडस भागातील अंभेरपाडा आणि धोत्रेवाडी येथील शेतकऱ्यांच्या सुमारे १५ च्यावर बकऱ्याचा फडशा बिबट्याने पाडला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर बिबटयामुळे या भागात शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. दरम्यान या मृत बकऱ्याचा पंचनामा प्रशासनाकडून करण्यात आला असून अधिक तपास वन विभागाकडून केला जात आहे.

कर्जत तालुक्याचे टोक म्हणून तालुक्यातील खांडस अंभेरपाडा भाग समजला जातो. यापुढे भीमाशंकर अभयारण्य असून त्यापुढे पुणे जिल्ह्याची हद्द सुरू होते. दरम्यान भीमाशंकर अभयारण्य येथून जनावरे चुकून येत असल्याच्या घटना याआधी देखील घडल्या आहेत. अशात दोन दिवसांपूर्वी अंभेरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाचीवाडी मधील शेतकरी धारवड यांच्या म्हण्यानुसार त्यांच्या चार बकऱ्या हे शेतात चरण्यासाठी सोडल्या असताना सायंकाळी बिबट्याने त्यांचा फडशा पाडला. तर धारवड यांनी शेतात पाहिले असताना त्यांना दोन बकऱ्या मृत अवस्थेत मिळून आल्या. तर दिनांक १९ रोजी पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील धोत्रेवाडी येथील मारुती रामजी दरवडा या शेतकऱ्यांनी देखील जवळच्या माळावर आपल्या सुमारे १४ बकऱ्या चरायला सोडल्या होत्या. त्यापैकी एक बकरी ही गाभण असल्याने त्यांनी तिला थोड चरून झाल्यावर परत आपल्या गोठ्यात आणून सोडली. तर सायंकाळी आपल्या बकऱ्या परत गोठ्यात आण्यांसाठी ते माळावर गेले असता त्यांना काही बकऱ्या या मृत अवस्थेत मिळून आल्या. बकऱ्याच्या मानेचा घेतलेला लचका पाहता हे काम बिबट्याचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच त्यांनी लागलीच प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानुसार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच ग्रामसेवक, तलाठी यांनी मृत बकऱ्याचा पंचनामा केला. तसेच बकऱ्याचा बिबट्याने फडशा पाडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर वन्य प्राण्याने नुकसान केल्यामुळे शासनाने याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

आम्हाला याबाबत माहिती मिळताच आमचे वन विभागाचे कर्मचारी यांनी तत्काळ दोन्ही ठिकाणी भेट देत पाहणी केली. अंभेरपाडा आणि धोत्रेवाडी येथे प्रत्येकी दोन बकऱ्याचे अवशेष वन कर्मचाऱ्यांना मिळून आले आहेत. तर शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या बकऱ्याची संख्या जास्त होती. त्यामुळे अधिक तपास करून शासन नियमाप्रमाणे कारवाई करत संबंधितांना भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
: प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्जत पूर्व