
महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळं विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अंगणवाडी सेविकांवरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल करत महाराष्ट्राचा उडता पंजाब कोण करतेय, असा सवाल केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेशीमबागेत-
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात हजेरी लावली. एकनाथ शिंदे यांनी रेशीमबागेत जात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळावर भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार भरत गोगावले यांची उपस्थिती होती.
सुषमा अंधारेंवर हक्कभंगाचा प्रस्ताव-
शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकत भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यावर वारंवार टीका करुन त्यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळं देवयानी फरांदे यांनी या प्रकरणी हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिला होता. आज सभागृहात प्रविण दरेकर यांनीही सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव दाखल केला. त्यावर विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांनी आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं आज सुषमा अंधारेवरुन विधिमंडळात चांगलंच रणकंदन झालं.
जातीनिहाय गणनेवरुन विरोधक आक्रमक-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी रेशीमबागेत भेट दिल्यानंतर जातीनिहाय जणगणनेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. “जनभावना लक्षात घेऊन जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला जाईल”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. मात्र सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मराठा आरक्षणावर मांडलेल्या मताशी आम्ही सहमत नसल्याचं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आम्हाला देखील त्यावर बोलायला संधी मिळायला हवी, असं स्पष्ट केलं. राज्यात ताजीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही आमची मागणी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.