नवी दिल्ली- भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष तसंच भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात गेले महिनाभर दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान हे आंदोलन मोडीत काढण्याचाही प्रयत्न अनेकदा झाले आहेत.मात्र, ब्रिजभूषणच्या कारवाईवर ठाम असलेल्या पैलवानांनी दंड थोपटून हे आंदोलन सुरूच ठेवले होते. दरम्यान आता आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेले ऑलिम्पिक पदक विजेते साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी आंदोलन कायम ठेवत रेल्वेत कामावर रूजू होण्याचा देखील निर्णय घेतला आहे.
मैदान सोडलंय पण लढाई नाही,असं म्हणत हे आंदोलक खेळाडू पुन्हा आपल्या कामावर रूजू झाले आहेत. ३ जूनच्या रात्री विनेश फोगट, बजरंग पुनिया व साक्षी मलिक यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हापासून त्यांनी आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त पसरले आहे. मात्र,त्याला अधिकृत दुजोरा कोणताच नव्हता. ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. न्यायाच्या लढाईत आमच्यापैकी कोणीही मागे हटले नाही. आंदोलनाबरोबरच मी रेल्वेतील माझी जबाबदारी पार पाडत आहे. कृपया कोणतीही चुकीची बातमी पसरवू नका असं म्हणत एक ट्विट साक्षी मलिक हिने केलं होतं
तर दुसरीकडे आमचे नुकसान करण्यासाठी या बातम्या पसरविल्या जात आहेत. आम्ही आंदोलन मागे घेतले नाही,असं मत देखील आंदोलक कुस्तीपटू बजरंग पुनिया याने व्यक्त केलं आहे. ‘जंग अभी भी जारी है’असा पवित्रा घेत हे आंदोलक कुस्तीपटू अजूनही भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.