देवरूख कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त  व्याख्यान व भेटकार्ड स्पर्धा…

Spread the love

देवरूख- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रेरणादायी व्याख्यान व भेटकार्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारा शिक्षक नव्हे, तर जीवनाला योग्य दिशा दाखवणारा दीपस्तंभ असल्याचे नमूद करून, गुरुंच्या भूमिकेचे महत्त्व उलगडून सांगितले. त्याचप्रमाणे पारंपरिक गुरु-शिष्य परंपरेपासून ते आधुनिक शिक्षणपद्धतीमधील बदलावर सखोल मार्गदर्शन केले.
    
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या  प्रा. सीमा शेट्ये यांनी ‘गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारप्रवृत्त करणाऱ्या वक्तव्यातून विद्यार्थ्यांच्या मनात गुरुंबद्दलचे स्थान व गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज विशद केली. संस्कार, शिक्षण, शिस्त, मूल्ये व कृतज्ञता यांचे महत्त्व पटवून देत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भेटकार्डचे विशेष कौतुक केले. कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त गेली अनेक वर्ष भेटकार्ड बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते, ही फार महत्वाची बाब असल्याचे याप्रसंगी केले.

महाविद्यालयात जमा असलेल्या सर्व भेटकार्डांचे प्रदर्शन लावण्याविषयीचा मानस व्यक्त केला. विद्यार्थ्यांसाठी गुरुपौर्णिमेनिमित्त भेटकार्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून गुरूंप्रती आदर व्यक्त करणारी सुंदर व अर्थपूर्ण भेटकार्ड सादर केली. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. धनंजय दळवी यांनी केले. प्रा. दळवी यांनी विद्यार्थ्यांना कलेतील गुरुचे स्थान, गुरुमुळे शिष्याचा होणारा विकास व मिळणारे यश याबाबतची उदाहरणे दिली. महाविद्यालयातील कलाक्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत सविस्तर आढावा घेतला. पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. अभिनय पातेरे आणि प्रा. देवयानी जोशी उपस्थित होते. 

*भेटकार्ड स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:*

प्रथम क्रमांक: तन्वी धावडे (१२ वी वाणिज्य).
द्वितीय क्रमांक: सृष्टी मानकर (१२ वी वाणिज्य-ब).
तृतीय क्रमांक: (विभागून): मनस्वी शेलार (१२ वी वाणिज्य) आणि अपूर्वा भोसले (१२ वी कला)
उत्तेजनार्थ पुरस्कार: भारती गोरे (१२ वी संयुक्त-वाणिज्य) आणि मनीष रेवाळे (१२ वी संयुक्त-वाणिज्य)
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे, प्रा. विजय मुंडेकर, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरेश राणे यांनी केले. शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.
*फोटो:* भेटकार्ड बनवण्याच्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसोबत उपप्राचार्य डॉ. पाटील आणि उपस्थित शिक्षक.
*छाया:* प्रा. वैभवी घोसाळकर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page