मुंबईत पार पडलेल्या मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेत झेक प्रजासत्ताक देशाच्या क्रिस्टिना पिस्कोव्हा हिनं मिस वर्ल्ड 2024 चा किताब पटकावला. तर लेबनॉनची यास्मिना हिनं रनरअप विजेता पदावर नाव कोरलं. भारताची सिनी शेट्टी हिला मात्र पहिल्या चार स्पर्धकांमध्ये स्थान पटकावता आलं नाही.
मुंबई: झेक प्रजासत्ताक देशाच्या क्रिस्टिना पिस्कोव्हा हिनं मिस वर्ल्ड 2024 चा मुकूट पटकावला. मुंबईतील जिओ कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडलेल्या रंगारंग कार्यक्रमात मिस वर्ल्ड 2024 चा सोहळा शनिवारी रात्री पार पडला. यावेळी बोलताना मिस वर्ल्ड 2024 चा मुकूट पटकावलेल्या क्रिस्टिना पिस्कोव्हा हिनं कृतज्ञता व्यक्त केली. “मिस वर्ल्ड 2024 चा किताब मिळाल्यानं मी खूप उत्साही आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी यासाठी काम करत आहे. मिस वर्ल्ड 2024 चा किताब पटकावल्यानं मी आता जास्तीत जास्त मुलांना मदतीचं काम करू शकेल,” असं तिनं यावेळी स्पष्ट केलं.
क्रिस्टिना पिस्कोव्हा मिस वर्ल्ड 2024…
मिस वर्ल्ड 2024 ची स्पर्धा मुंबईत शनिवारी रात्री आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंचावर 12 ज्युरींनी स्पर्धेत सहभागी झालेल्यांचं परिक्षण केलं. यात बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, मिस वर्ल्ड संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युलिया एव्हलन मॉर्ले, समाजसेविका अमृता फडणवीस, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला, पत्रकार रजत शर्मा, विनीत जैन, मिस वर्ल्ड इंडियाचे चेयरमन जामिल सैदी आदींसह माजी तीन मिस वर्ल्ड यांचा समावेश होता. यावेळी परिक्षकांनी झेक प्रजासत्ताक देशाच्या क्रिस्टिना पिस्कोव्हा हिला मिस वर्ल्ड 2024 घोषित केलं. त्यावेळी मंचावर एकच जल्लोष साजरा करण्यात आला.
तब्बल 28 वर्षानंतर भारतात पार पडली मिस वर्ल्ड स्पर्धा…
मिस वर्ल्ड 2024 ही स्पर्धा मुंबईतील जिओ कन्व्हेंशन सेंटर इथं पार पडली. यावेळी देशातील अनेक नामांकित दिग्गज मिस वर्ल्ड स्पर्धेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मिस वर्ल्ड स्पर्धा तब्बल 28 वर्षानंतर भारतात आयोजित करण्यात आली आहे. या अगोदर 1997 ला मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती.
भारताची सिनी शेट्टी 8 व्या स्थानावर…
मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेत सहभागी झालेली भारताची स्पर्धक सिनी शेट्टी हिला या स्पर्धेत समाधानकारक कामगिरी करता आली नाही. सिनी शेट्टीला 8 व्या स्थानावर समाधान मानवं लागलं. सिनी शेट्टी ही मूळची कर्नाटकची असून तिचा जन्म 2 ऑगस्ट 2001 साली मुंबईत झाला आहे. सिनी शेट्टीचे वडील सदानंद शेट्टी यांचा मुंबईत हॉटेलचा व्यवसाय आहे.