
आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत उपस्थित केला मुद्दा…*
मुंबई :- महाराष्ट्रामध्ये देखील लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या हालचाली तीव्र झाल्या असून, लवकरच लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत बोलताना याविषयी प्रश्न उपस्थित केला आहे.
हिंदू जन आक्रोशाला न्याय मिळणार असून, हिंदू मुलींना लवकरच न्याय मिळेल, अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
लव्ह जिहादच्या विषयासंदर्भात आमदार लाड यांनी मांडलेल्या लक्षवेधी प्रश्नावर विधान परिषदेत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या विषयी कायदा व्हावा, अशी आमची मागणी असल्याचे मत, आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी व्यक्त केले.
लव्ह जिहादच्या प्रकरणात फसवणुकीतून विवाह आणि त्या काळात होणारे धर्मांतरण हा विषय गांभीर्याचा असून, केरळसारख्या राज्यात देखील या विषयाला गांभीर्याने घेतले आहे. १४ ते १८ वर्ष वयोगटातील मुलींना फसवून असे प्रकार घडत असून, अशा प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी सांगितले.
मुंबईसारख्या शहरांमध्ये जिकडे झोपडपट्टीचा भाग आहे, तेथील मुलींना आमिष दाखवून फसवल जात असून, लव्ह जिहादची प्रकरणे घडत आहेत. त्यामुळे लव्ह जिहादचा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असून, हिंदू समाजातील मुलींवर होणारा हा अन्याय रोखण्यासाठी कडक कायदा करण्याची गरज असल्याची भावना आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेच्या सभागृहात व्यक्त केली.
सभागृहात उत्तरादाखल बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी सकारात्मक उत्तर दिले आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि,..
“मुळातच, या विषयाच गांभीर्य शासनाला समजलं असून, शासनाने याविषयाची नोंद घेतलेली आहे.
राज्यभरात या विरोधात ४० मोर्चे निघाले असून, या मोर्च्यांमध्ये हजारो नागरिक एकत्रित आल्याचे निदर्शनास आले होते. याचा अर्थ समाजामध्ये या विरोधात एक भावना आहे. ही भावना देखील शासनाने लक्षात घेतली आहे.”
त्याचप्रमाणे इतर राज्यांनी केलेल्या कायद्यांची माहिती मागवली जाईल आणि आपल्या राज्यात अशा प्रकारचा कायदा केला पाहिजे व त्यात काय तरतुदी केल्या पाहिजेत, याचा अभ्यास करून, मग त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे मत उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
तसेच जनतेच्या भावना व विविध मोर्च्याच्या माध्यमातून पुढे आलेल्या आहेत. या भावनांच्यासंदर्भात निणर्य घेणं, सरकारच्या विचाराधीन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याठिकाणी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे येत्या काळात राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.