
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणा-या पावसाने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. सतत पडणा-या पावसामुळे दापोलीसह, खेड, चिपळूण व संगमेश्वर तालुक्यांना झोडपून काढले आहे. संगमेश्वर माखजन बाजारपेठेत पुन्हा पाणी शिरल्याने दहा पेक्षा जास्त दुकाने पाण्याखाली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. मध्यरात्री पाणी शिरल्याने दुकानदारांची तारांबळ उडाली.
जिल्ह्यात गेले दोन दिवस पडणाऱ्या संततधार पावसाचा फटका माखजन बाजारपेठेला बसला आहे. पावसाचा जोर वाढल्याने गडनदीच्या पुराचे पाणी माखजन बाजारपेठेतील १० पेक्षा जास्त दुकानात घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रक्षाबंधन गोकुळाष्टमी व पाठोपाठ येणाऱ्या गणेश उत्सवामुळे अनेक दुकानात या सणासुदीचा माल भरलेला असल्याने व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

काही व्यापाऱ्यांना माल बाहेर न काढता आल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच माखजन बाजार पेठेतून सरंद गावाकडे येणारा रस्ता गडनदीच्या पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद झाला. कासे रस्त्यावर पाणी आल्याने कासे, कळंबुशी, पेढांबे कडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. संगमेश्वर, खेड, चिपळूण व दापोली या तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे.
गडनदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर वाशिष्टी व जगबुडी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. जगबुडी व राजापुर तालुक्यातील कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. राजापुरसह खेड शहरातील बाजार पेठेत पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे. या ठिकाणी पूरस्थिती उद्भविण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबरोबर चिपळूण येथील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पावसाने घातलेल्या थैमानामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पूरस्थिती भागातून आपत्ती बचाव पथकाची तुकडी तैनात करण्यात आल्या आहेत.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर