
इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांचा पासपोर्ट तात्काळ रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे. “आम्हाला गेल्या २४ तासांत महत्त्वाची माहिती मिळाली आहे…
इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना वानुआतू सरकारकडून मोठा धक्का बसला आहे. ललित मोदी यांनी वानुआतूचे नागरिकत्व स्वीकारले होते. मात्र, आता वानुआतूच्या पंतप्रधानांनी त्यांचा पासपोर्ट तात्काळ रद्द करण्याचा आदेश दिला आहे.
वानुआतूचे पंतप्रधान जोथाम नापाट यांनी सांगितले की, “मी नागरिकत्व आयोगाला ललित मोदींचा पासपोर्ट रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.” ते म्हणाले की, पार्श्वभूमी तपासणीमध्ये त्यांच्याविरोधात कोणत्याही गुन्हेगारी दोषांचा उल्लेख नव्हता. मात्र, गेल्या २४ तासांत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी लालित मोदींविरुद्ध अलर्ट नोटीस जारी करण्याची विनंती केली होती, मात्र इंटरपोलने पुरेशा न्यायालयीन पुराव्याच्या अभावामुळे दोनदा भारताच्या विनंतीला नकार दिला होता. हा अलर्ट जारी झाला असता, तर ललित मोदींचा नागरिकत्व अर्ज आपोआप नाकारला गेला असता. पण तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती.
नागरिकत्व देखील रद्द होणार?…
वानुआतूचा पासपोर्ट हा हक्क नसून एक विशेषाधिकार आहे आणि नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्यांना त्यासाठी योग्य आणि वैध कारणे प्रदान करावी लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना त्यांनी, परंतु, या कारणांमध्ये प्रत्यार्पण (extradition) टाळण्याचा प्रयत्न समाविष्ट असू शकत नाही. उपलब्ध झालेल्या नव्या माहितीवरून, लालित मोदींनी प्रत्यार्पण टाळण्यासाठीच वानुआतूचे नागरिकत्व मिळवले होते, असे स्पष्ट होते” असेही त्यांनी नमूद केले.
१५ वर्षांपूर्वी आयपीएल सुरू करणारे ललित मोदी घोटाळ्याचा आरोप झाल्यावर ब्रिटनला गेले. त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने ब्रिटनकडे अनेकदा केली आहे. हे प्रकरण ब्रिटनमध्ये सुरूच असताना ललित मोदींनी अचानक वानुआतूचे नागरिकत्व घेतले. आता तिथूनही त्यांना मोठा झटका मिळाला आहे.