
मनमाड : सध्या राज्यभरात जीर्ण झालेल्या पोलिस वसाहती, चाळी व पोलिस स्थानकांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मनमाड शहरही याला अपवाद नाही. शहरातील दोन पोलिस इमारती, तीन चाळी आणि एक अधिकारी निवासस्थान पूर्णपणे मोडकळीस आले आहेत.
जीर्ण पोलीस वसाहतींमुळे अनेक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. इतकेच नव्हे तर मनमाड पोलिस ठाण्याची इमारतही जीर्ण झाली असून, पावसाळ्यात गळती, अरुंद शौचालये, वीज आणि पाण्याच्या सोयींचा अभाव अशा असुविधांमध्ये पोलिसांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. 2015 साली शासनाला या इमारती, चाळी आणि पोलिस ठाणे तोडून त्या जागी नवीन आणि अत्याधुनिक इमारती आणि पोलिस स्थानक बांधण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे, मात्र 10 वर्षांचा कालावधी उलटून देखील हा प्रस्ताव लालफितीत अडकून पडला आहे.
मनमाड शहरात ब्रिटिश कालखंडात, १९१६ साली पोलिस स्थानकाची स्थापना झाली होती. स्वातंत्र्यानंतरही हे पोलिस स्थानक मूळ ठिकाणीच राहिले आहे. तेव्हा शहराची लोकसंख्या कमी असतानाही १३२ पोलिसांची मंजूर संख्या होती. परंतु, आज लोकसंख्या सव्वा लाखांवर गेली असून, १९ गावांचा समावेश असलेल्या या पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक झाले आहे. शिवाय रेल्वे जंक्शन, इंधन कंपन्यांचे डेपो, अन्न महामंडळाचे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे धान्य गोदाम आणि पुणे-इंदूर महामार्ग हे सर्व घटक मनमाडला संवेदनशील बनवतात.
आजच्या घडीला केवळ ४०-४२ पोलिस कर्मचारी प्रत्यक्ष कार्यरत असून त्यापैकी काहीजण न्यायालयीन कामकाज, सुट्ट्या, रजेवर असल्यामुळे केवळ १५-२० पोलिस शहर व परिसरातील कायदा-सुव्यवस्था सांभाळत आहेत. यामुळे पोलिसांवर ताण वाढला असून तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पोलिस वसाहतीत एकेकाळी अधिकारी आणि कर्मचारी कुटुंबांसह राहत असत. त्या जुन्या चाळी आणि इमारती आता धोकादायक अवस्थेत पोहोचल्या आहेत. तुटलेली दारे-खिडक्या, भेगा पडलेल्या भिंती, स्लॅब कोसळण्याचा धोका, गळती आणि चाळींमध्ये वाढलेले गवत यामुळे सापांपासून धोका निर्माण झाला आहे. पोलिस ठाण्याची इमारतही फारच जीर्ण असून पावसाळ्यात छत गळते, कौलारू छप्पर धोकादायक आहे, तर शौचालये इतकी अरुंद आहेत की वापरणे कठीण झाले आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून २०१५ साली नवीन वसाहत आणि पोलिस स्थानक बांधण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, तब्बल दहा वर्षांचा कालावधी उलटूनही प्रस्ताव अद्यापही लालफितीत अडकलेला आहे. परिणामी, पोलिसांचे कुटुंबीय असुरक्षित वातावरणात राहत असून पोलिसांना देखील मनःशांतीने सेवा बजावता येत नाही.
मनमाडमधील पोलिसांची ही दयनीय स्थिती पाहता, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन नवीन इमारतीसाठी आवश्यक निधी मंजूर करावा, अशी जोरदार मागणी नागरिक आणि स्थानिक समाजप्रेमी संस्था करत आहेत.
कर्मचारी वसाहत स्थिती १९१६ मध्ये पोलिस ठाण्याची स्थापना
*सहा एकर 47 गुंठ्यावर कर्मचारी इमारती, चाळी, पोलिस ठाणे*
*दोन कर्मचारी इमारतीत 48 तर तीन चाळींत 47 निवास्थाने*
*अधिकाऱ्यांसाठी दोन बंगले*
पोलिस अधिकारी, कर्मचारी संख्या
अधिकारी- ५
कर्मचारी-132
हजर कर्मचारी – 40 ते 45
पोलिस ठाणे हद्दीत समाविष्ठ गावे- 19