
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर येऊन तब्बल 7 तास उलटले आहेत. तरीही मूर्तीचे विसर्जन होऊ शकलेले नाही. समुद्राला भरती आल्यामुळे मूर्ती तराफ्यावर चढवण्यात आलेली नाही.
मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’, या अशा गजरात राज्यभरातील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील गणपतींना गणेश भक्तांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी (6 सप्टेंबर) निरोप दिला. पण मुंबईत मात्र, दुसऱ्या दिवसापर्यंत गणपती विसर्जनाच्या मिरवणूका चालतात. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लालबागचा राजा गणपती तसेच, चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती गिरगाव चौपाटीवर पोहोचतात आणि त्यानंतर तिथे विसर्जन केलं जातं. पण यंदा लागबागचा राजा गणपतीच्या विसर्जनाला बराच विलंब लागत असल्याचं समोर आलं आहे. तर चिंचपोकळीचा चिंतामणी गणपतीचं विसर्जन झालं आहे.
23 तासांच्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’ गिरगाव चौपाटीवर : खरं तर, लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लाखोंचा जनसागर लोटला आहे. 23 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. तब्बल 3 तास उलटले आहेत, तरीही या मूर्तीचे विसर्जन होऊ शकलेले नाही. समुद्राला भरती आल्यामुळे लालबागचा राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात आलेली नाही. आता समुद्राची भरती ओसरल्यानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन केले जाईल, अशी माहिती समोर येत आहे.
वास्तविक, शनिवारी (6 सप्टेंबर) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाची मूर्ती मंडपातून निघाली होती. ती आज सकाळी 7:45 वाजता गिरगाव चौपाटीवर पोहोचली. मात्र, समुद्राला आलेली भरती आणि काही तांत्रिक अडचणींमुळे विसर्जन प्रक्रिया अजूनही रखडली आहे. लालबागचा राजासाठी यंदा खास पद्धतीने तराफा बनवण्यात आला आहे. या तराफ्यावरून बाप्पाला समुद्रात नेण्यात आलं.
नव्या तराफ्यामुळे गणपती विसर्जनात अडथळा….
यंदा प्रथमच वापरण्यात आलेला अत्याधुनिक मोटराइज्ड तराफा, जो गुजरातमधून खास तयार करून आणला गेला आहे, त्यावर मूर्ती चढवण्याच्या प्रक्रियेत अडचणी येत आहेत. या नव्या तराफ्यामुळे विसर्जन सोहळ्याला एक आधुनिक रूप मिळालं आहे. हा तराफा 360 अंशात फिरण्यास सक्षम असून, त्याच्या चहुबाजूंनी उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यांमुळे सोहळ्याला एक वेगळाच थाट आला आहे. पारंपरिक दोन बोटींऐवजी स्वयंचलितपणे समुद्रात मूर्ती नेण्यासाठी डिझाइन केलेला हा तराफा आहे. मात्र भरतीच्या वेळी किनारपट्टीवर येणाऱ्या मोठ्या लाटांमुळे प्रचंड हलत आहे. त्यामुळे मूर्ती चढवण्यात अडचणी येत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विसर्जन प्रक्रिया जलद होईल, अशी अपेक्षा होती. परंतु समुद्राच्या लाटांमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे यंदा विसर्जन विलंबित झालं आहे.
दीड तासांपासून शर्थीचे प्रयत्न….
गेल्या दीड तासांपासून लालबागचा राजा मूर्ती समुद्रकिनाऱ्यावरून तराफ्यावर चढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, विविध अडचणींमुळे हे प्रयत्न अद्याप यशस्वी होऊ शकलेले नाहीत. मूर्ती ज्या ट्रॉलीवर ठेवली आहे, ती सरकत नसल्यानं चढवण्याची प्रक्रिया कठीण झाली आहे. कोळीबांधव आणि जीवरक्षकांच्या टीमनंही यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. पण लाटांच्या तीव्रतेमुळे ते प्रयत्न सफल होऊ शकले नाहीत. सध्या मूर्ती समुद्रकिनाऱ्यावरच आहे, आणि विसर्जनापूर्वीची आरती अद्याप झालेली नाही. त्याचबरोबर, मंडळ व्यवस्थापन नव्या तराफ्यावर मूर्ती चढवण्यासाठी निरंतर पर्याय शोधत आहे. एका पर्याय म्हणून मूर्तीचे दागिने काढून ती तराफ्यावर चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यातही यश मिळालेलं नाही. मध्यंतरी, जुना पारंपरिक तराफा वापरण्याचा विचार सध्या करण्यात येत आहे. ओहोटी येण्यासाठी आणखी 3 तासांचा अवकाश असल्यानं, विसर्जन पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
चिंचपोकळीचा चिंतामणी गणपतीचं विसर्जन : दरम्यान, चिंचपोकळीचा चिंतामणीचं गिरगाव चौपाटीवर सुखरूप विसर्जन करण्यात आलं. चिंतामणीचा तराफा बोटींनी ओढून समुद्रात नेण्यात आला आणि मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर