शेतीला जोड व्यवसाय म्हणून सुरू केलेल्या मधमाशी पालनातून लाखोंचं उत्पन्न; तरुणांची किमया….

Spread the love

अहमदनगर जिल्ह्यातील अंबड येथील उच्च शिक्षित दोन भावंडांनी बेरोजगारीवर मात करत शेतीला जोडधंदा म्हणून मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू केला. शेती उत्पादनात वाढी बरोबर मधविक्री करून आर्थिक उन्नती साधलीय. या व्यवसायातून त्यांनी वर्षकाठी 50 लाखांचा टर्नओव्हर करत सध्या ते भारतभर भ्रमंती करताहेत.

अहमदनगर- सह्याद्री पर्वतांच्या रांगा आणि निसर्गाने नटलेल्या निसर्गरम्य अकोले तालुक्यातील अंडब येथील राजू भाऊसाहेब कानवडे यांनी बीए पदवी तर संदेश कानवडे यांनी बीई मेकॅनिकलची पदवी घेतली आहे. या दोन उच्च शिक्षित भावंडांनी 2008 साली मधमाशी पालन व्यवसाय सुरू केला. शेतीसाठी परागी भवनाच्या माध्यमातून स्वतःच शेती उत्पादन वाढवलं; मात्र मध उत्पादन घेऊन त्यातून उपपदार्थ निर्मिती करत आर्थिक उन्नती साधलीय. शेतीसाठी मधमाशांचं महत्त्व किती हे त्यांनी दाखवून दिलं. सुरुवातीला मधमाशांच्या 25 पेट्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय हळूहळू दीड हजारपेक्षा जास्त पेट्यांपर्यंत पोहोचला. कानवडे यांच्या मधमाशांना आता देशभरातून मागणी वाढू लागली आहे.

▪️मधमाशांचे फायदे:

मधमाशांचा वापर फक्त मधासाठीच नव्हे तर शेतीतील भाज्या, फळे, कांदा, लसूण आदी पिकांचं उत्पादन वाढविण्यासाठी कसा करता येतो, हे त्यांनी सप्रयोग दाखवून दिले. इतर शेतकऱ्यांचाही त्यामुळे मोठा फायदा होत आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मधमाशा देखील संपविल्या; मात्र शेती उत्पादन वाढवण्यासाठी मधमाशांची मोलाची मदत होत असल्याचं राजू कानवडे यांनी सांगितलं.

▪️मधमाशांचा व्यवसायातून साधली आर्थिक उन्नती:

एक एकर डाळिंब फुलोऱ्यात आले की, 15 ते 20 दिवस परागीभवन करण्यासाठी मधमाश्यांच्या पाच पेट्या तेथे ठेवल्या जातात. त्यासाठी दहा हजार रुपये शुल्क घेतले जाते. या व्यवसायातून आम्हाला मोठे उत्पन्न मिळते. एका पेटीचं भाडं दोन हजार तर विक्री किंमत चार हजार आहे. मधापासून विविध उपपदार्थ आम्ही तयार करतो. यातून आमचं स्वतःचं उत्पादन मोठमोठ्या कंपन्यांना आम्ही पुरवत असल्याचं संदेश कानवडे यांनी म्हटलं आहे.

▪️’या’ राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी:

कानवडे बंधूंनी मधमाशा पालनाचा व्यवसाय शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सुरू केलाय. आज केरळ, मध्य प्रदेश, गुजरात, अशा विविध राज्यात ते मधपेट्या पोहचविल्या. अकोले सारख्या ग्रामीण भागात दोन तरुण शेतकऱ्यांनी साधलेली प्रगती नक्कीच कौतुकास्पद असून इतर तरुण शेतकऱ्यांनी देखील यांचा आदर्श घेतला तर शेतीतून तेही प्रगती साधतील, यात शंका नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page