मुंबई : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात ज्या सहकारी पतसंस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट कार्य केले आहे. अशा सहकारी पतसंस्थाना अविज पब्लिकेशन , कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा , पुणे यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षी बँको ब्ल्यू रिबन पुरस्काराचे आयोजन केले जाते.
सन २०२२ या वर्षासाठी बँको ब्ल्यू रिबन पुरस्कारासाठी संस्थेची आर्थिक स्थिती , व्यवस्थापन , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , व्यवसाय वाढीसाठी केलेल्या नविन योजना इ. बाबत संपूर्ण माहितीच्या आधारे , तज्ञ निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार नागरी पतसंस्था ठेवी रु. ३५ ते ५० कोटीपर्यंत या विभागामध्ये सलग पाचव्या वर्षी राज्यस्तरीय ” बँको ब्ल्यु रिबन – २०२२ ” या पुरस्कारासाठी कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या लांजा या पतसंस्थेची निवड करणेत आली.
दि. १६ मार्च २०२३ महाबळेश्वर येथे ॲडव्हान्टेज २०२३ या राज्यस्तरीय सहकार परिषदेमध्ये “बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार” कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या. लांजा या पतसंस्थेला मा. श्री. शरद गांगल अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक लि. ठाणे यांचे शुभहस्ते संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत परवडी, उपाध्यक्ष श्री. विलास दरडे, संचालक श्री. नंदकुमार आंबेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप डाफळे यांना दिमाखदार समारंभात प्रदान करण्यात आला.
स्थापनेपासून सभासदाभिमुख कारभार करणाऱ्या कुणबी विकास सहकारी पतसंस्थेने अल्पावधीतच लांजा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आपला नावलौकिक मिळवला आहे. संस्थेने आपला संपूर्ण कारभार हा संगणीकृत केला असून सर्वच आर्थिक व्यवहारांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केला जातो. प्रभावी कर्ज वसुली यंत्रणा राबवून ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. पतसंस्थेने संपूर्ण रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्रात वाढ करून रत्नागिरी, देवरुख व चिपळूण येथे नवीन शाखा सुरु केल्या असून पतसंस्था आपले कामकाज अतिशय उत्तम पद्धतीने करत आहे. संस्थेस सतत “ अ ” वर्ग प्राप्त झाला आहे, संस्था सातत्याने नफ्यात आहे, सभासदांना दरवर्षी १२.५० % लाभांश देत आहे, व्यवसाय वृद्धी, सीडी रेशो, एनपीए, कर्ज वसुली यांचे आदर्श प्रमाण संस्थेने राखले आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभासदांना उत्तम प्रकारे सेवा देण्याचे काम संस्था करीत आहे. यामुळे सभासदांची विश्वासाहर्ता वाढली आहे. संस्थेची व्यवसायातील वाढ, ग्राहक सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, पिग्मी व रिकरिंग प्रतिनिधी यांचे उत्कृष्ट सहकार्य यामुळे हे साध्य झाले आहे. या सर्वांसाठी साथ देणारे संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांचे आभार संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत परवडी यांनी मानले. बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातून कुणबी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकारी, संचालक व कर्मचारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.