कुमार महाराष्ट्र केसरी पैलवानाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू….

Spread the love

*पुणे-* पुण्याच्या मुळशी तालुक्यात एका पैलवानाचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. विक्रम पारखी असं मृत पैलवानाचे नाव आहे. बुधवारी सकाळी मुळशी तालुक्यातील माण येथे जिममध्ये ही घटना घडली. राष्ट्रीय खेळाडू पैलवान विक्रम पारखी यांचे आकस्मिक निधनाने माणसह मुळशीवर शोककळा पसरली आहे.

विक्रमचे येत्या १२ डिसेंबरला लग्न होणार होतं. घरात लग्नाची धामधून सुरू होती. मात्र त्याआधीच काळाने त्याच्यावर झडप घातली. नियतीच्या मनात काही वेगळच असल्याने संसाराच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच तो आयुष्याच्या आखाड्यात चितपट झाला आहे.  विक्रमच्या मृत्यूने पारखी लग्नघरावर शोककळा पसरली आहे.

पैलवान विक्रम पारखी हे मुळशी तालुक्यातील माण येथे राहण्यास होते. बुधवारी सकाळी ते माण येथे असणाऱ्या जिममध्ये व्यायामासाठी गेले होते. तेथे व्यायाम करत असताना त्यांना अचानक त्रास होऊ लागला. त्यांना तात्काळ पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.                            

विक्रमने कुमार महाराष्ट्र केसरीसह अनेक राष्ट्रीय पदकं आणि किताब पटकावले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेतही सहभाग घेतला होता. कुमार महाराष्ट्र केसरी, ब्रॉंझ पदक, आदर्श व गुणी खेळाडू असे अनेक किताब त्याने पटकावले आहेत. मुळशीतल्या माणगावचा भूमिपुत्र असलेल्या विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपले नाव कोरले होते.

२८ नोव्हेंबर २०१४ रोजी वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित “महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०१४” झाली होती. त्या स्पर्धेत विक्रमने अजिंक्यपद मिळवले होते. विक्रम याने अनेक राष्ट्रीय पदके व किताब मिळवले आहेत.  माजी सैनिक शिवाजीराव पारखी यांचे ते चिरंजीव तर युवा नेते बाबासाहेब पारखी यांचे बंधू होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page