
विलास गुरव/चिपळूण- रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या सोलार पंप व वीज कनेक्शनचा प्रश्न आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत मांडला.
ते म्हणाले, “आतापर्यंत जिल्ह्यात फक्त २५ सोलार पंप वाटप झाले असून ३०३ अर्ज प्रलंबित आहेत.याशिवाय अनेक शेतकऱ्यांकडे लहान लहान सातबारा असल्यामुळे तांत्रिक कारणामुळे सोलार योजनेचा लाभ मिळत नाही.”
“कोकणात चार महिने पावसाचे प्रमाण जास्त असल्याने अनेक ठिकाणी सोलार पंप फायदेशीर ठरत नाहीत. त्यामुळे नारळ व पोफळीच्या बागांमध्ये असलेल्या बोरवेलसाठी वीज कनेक्शन मिळणं अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
त्यांनी शासनाचे लक्ष वेधत म्हटले की, महाराष्ट्राचा एकूण कोटा न पाहता जिल्ह्यानिहाय लोकसंख्येनुसार सोलार वाटपाचे धोरण ठरवावे,तसेच जे अर्ज प्रलंबित आहेत, त्यांचा विचार करून शेतकऱ्यांना सोलार किंवा वीज कनेक्शन मिळावे.
“या मागण्या शासनाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेसाठी मांडत,” आमदार शेखर निकम यांनी शेतकऱ्यांच्या भावना सभागृहात मांडल्या.