
*संगमेश्वर / वार्ताहर-* सध्या कोकणात शिमगोत्सवाचे वातावरण असल्याने घरोघरी देव देवतांच्या पालख्या भाविकांच्या भेटीला जात असतात. या भक्तिमय वातावरणाचा आपोआप घरातील लहान मुलांवर त्याचा परिणाम होत असतो. असं म्हणतात की लहान मुलांना शिकवावं लागत नाही आपोआप ते मोठ्यांच अनुकरण करत असतात.घरातील मंगलमय व चांगल्या वातावरणाचा मुलावर चांगला परिणाम झालेला दिसून येतो.
संगमेश्वर बाजारपेठेतील लहान मुलांनी याचीच प्रचिती आणून दिली.सध्या बाजारपेठेतून देवी जखमाता व देवी निनावी यांच्या पालख्या घराघरांतून भक्तांच्या भेटीला जात असतात.घरातील हे वातावरण बघून या लहान मुलांच्या देखील मनात लहानशी पालखी बनविण्याचं ठरलं आणि ताबडतोब ते अमलात पण आणलं.मुलांनीच कार्ड बोर्ड ची लहानशी पालखी बनवली त्यात देवतांचे फोटो ठेवले आणि छोट्या ढोल व पिपाणीच्या आवाजात हे लहान मानकरी अनवाणी पालखी घेऊन बाजारपेठेतून भक्तांच्या भेटीला निघाले. बरं ही सगळी लहान मुलं 10 ते 12 या वयोगटातील आहेत.या वयात त्यांच्या मनावरील संस्काराचं विशेष कौतुक.
आजकाल तरुणाई शिक्षण आणि नोकरी निमित्ताने शहराकडे गेलेली आहे. पैसा कमविताना सुट्टी न मिळाल्या मुळे कधी कधी मनात असूनही गावाकडे येता येत नसेल अशा वेळी या लहान मुलांच्या मनावरील झालेले संस्कारच दाखवून देत आहेत की उद्याची पिढी हे सण साजरे करण्यासाठी तयार आहेत.
ते या वयातच आपली संस्कृती कशी टीकून राहील हा विचार करत तर नसतील ना .खरंच मानलं पाहिजे या मुलांना.आणि मोठ्यांनी त्यांच्या कडून शिकण्याची गरज आहे.
वरद भिंगार्डे, आराध्य भिंगार्डे, रूची भिंगार्डे, पुष्कराज झगडे, विघ्नेश मिरगल, परी गोरे, ओम चोचे या मुलांनी संपूर्ण बाजारपेठेत पालखी वाजत गाजत मोठ्या उत्साहात फिरवली.