
क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खास लेझर लाईट शो आणि लाईट इफेक्टचं आयोजन करण्यात येणार आहे. कोल्हापूरच्या तरुणांनी हा शो संयोजित केला आहे. हा शो कोल्हापूरचे दोन तरुण संपूर्ण जगाला दाखवणार आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर चमकणार कोल्हापूरचा ‘लेझर शो’कोल्हापूर Cricket World Cup Final :
यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यात होणार आहे. जगातील सर्वात मोठं स्टेडियम असणाऱ्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या सामन्यादरम्यान कोल्हापूरच्या तरुणांकडून करण्यात येणारा लेसर शो व लाईट इफेक्टचं खास आकर्षण असणार आहे.
लेझर शो मध्ये कोल्हापूरच्या तरुणांची कमाल :
आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ चौथ्यांदा अंतिम सामन्यात पोहोचलाय. तसंच यापूर्वी दोन वेळा भारतानं विश्वचषकावर नाव कोरलं होतं. यंदा तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे. देशभरात अंतिम सामन्यासाठी क्रिकेटचा फिव्हर जोरात चढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांना अधिक आनंद देण्यासाठी मैदानावर खास लेझर शो तसंच लाईट इफेक्ट करण्यात येतात. सामन्याच्या दुसऱ्या टप्प्यात अंधार पडल्यानंतर डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आकर्षणाचा केंद्र राहिलंय. डिम शो आणि ग्राफिक शो सादर केला जातो. हाच शो कोल्हापूरचे तरुण अख्ख्या जगाला दाखवणार आहेत. अमित पाटील आणि रामकृष्ण वागराळे अशी या तरुणांची नावे आहेत. 2011 ला सुरू केलेल्या लाईटच्या व्यवसायात त्यांनी नवनवे तंत्रज्ञान स्वीकारत जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केलीय.
मैदानावर 40 लेझर शो कार्यान्वित :
अहमदाबाद इथं होणाऱ्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यासाठी दिल्ली येथील हेड वे क्रिएशन या कंपनीसोबत हा शो सादर केला जाणार आहे. यासाठी 60 वॅट या क्षमतेचे 40 लेझर लावण्यात येणार आहेत. हा एक विक्रम असून यापूर्वी कधीही एका वेळेला मैदानावर 40 लेझर कार्यान्वित केलेले नाहीत. या लेझर शो साठी योगेश चौधरी, अमित पाटील, रामकृष्ण वागराळे, सागर पाटील, अभिषेक हांडे, रोहित कदम, उदय साळोखे, विनोद हाजुराणी, रवीकुमार, गणेश तटकरे यांची टीम मैदानावर कार्यरत आहे. यापूर्वी अयोध्या इथं दिवाळीसाठी राम मंदिर परिसरात तसेच उज्जैन येथील महाकाल मंदिरात कोल्हापूरच्या या खास लेझर लाईट वापरून शो करण्यात आलाय. तसंच दुबई इथं झालेल्या लग्न समारंभामध्ये 60 लेझर लावण्यात आले होते.