विराट कोहली याच्याकडून भारतीय समर्थकांना आणखी एका शतकाची अपेक्षा होती. मात्र पॅट कमिन्स याने विराटला बोल्ड केल आणि साऱ्या स्टेडियममध्ये एकच शांतता पसरली.
अहमदाबाद- वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये कांगारुंनी पुन्हा एकदा टीम इंडियाला बॅकफुटवर ढकललं आहे. कॅप्टन पॅट कमिन्स याने विराट कोहली याला क्लिन बोल्ड करुन ऑस्ट्रेलियाला मोठी विकेट मिळवून दिली आहे. टीम इंडियाने झटपट 3 विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहली याने केएल राहुल याच्यासोबत अर्धशतकी भागीदारी केली. शतकी भागीदारीच्या दिशेने प्रवास सुरु होता. मात्र पॅटने विराटचा काटा काढून ऑस्ट्रेलियाला मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिला.
टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाच्या शुबमन गिल-रोहित शर्मा या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात केली. रोहितने काही चेंडू शांतीत खेळल्यानंतर फटकेबाजीला सुरुवात केली. मात्र 30 धावांवर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली.शुबमन गिल 4 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर रोहित आणि विराट या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 36 रन्सची पार्टनरशीप केली. कॅप्टन रोहित न्यूझीलंडनंतर आता ऑस्ट्रेलिया विरुद्धही 47 धावांवर आऊट झाला.
रोहितनंतर श्रेयस अय्यर बॅटिंगसाठी आला. श्रेयस गेल्या काही सामन्यांपासून धमाकेदार बॅटिंग करतोय. त्यामुळे श्रेयस या सामन्यातही तशीच कामगिरी करेल, अशी आशा होती. मात्र श्रेयसने आऊट झाला. श्रेयसनेही गिलप्रमाणे 4 धावा केल्या. श्रेयसनंतर केएल मैदानात आला. केएल आणि विराट या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी एकेरी दुहेरी धावा करत धावफळक हलता ठेवला. या दरम्यान विराटने वर्ल्ड कपमधील सलग पाचवं अर्धशतक ठोकलं.
▪️विराटची कांगारुं विरुद्ध झुंज….
विराट-केएल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावा जोडल्या. मात्र पॅट कमिन्सने 29 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर विराटला बोल्ड केलं. विराटने 63 बॉलमध्ये 4 चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली.