
मुंबई- महाराष्ट्राचं राजकारण सध्या प्रचंड अनिश्चिततांनी भरलेलं आहे. राज्यातलं राजकारण सध्या ज्या वळणावर आहे, तेथून पुढे काय होऊ शकतं हा अंदाज वर्तवणं भल्या भल्या राजकीय तज्ज्ञांच्या आवाक्यातली बाब राहिलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकिय नेत्यांकडून राज्यात भूकंप होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर राज्यात सत्तापालट होणार अशी चर्चा रंगली होती. या चर्चेत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. परंतु तेव्हा असा एखादा भूकंप होईल असं कोणाच्या डोक्यातही आलं नसेल.
सुमारे दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी १५ दिवसांत राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज शरद पवारांनी अचानक पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पवारांच्या या राजीनाम्याच्या निर्णयाचा परिणाम केवळ राष्ट्रवादी पक्षापुरताच मर्यादित नसेल तर त्याचा दुरगामी परिणाम राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर देखील होऊ शकतो हे राजकारणाची जाण असलेला कोणताही सामान्य माणूस आत्मविश्वासाने सांगू शकतो.
मुंबईतील वाय बी सेंटरमध्ये आज शरद पवारांचं आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा होता. या सोहळ्यात शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. पवारांच्या या घोषणेने या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. शरद पवार यांनी राज्यसभा खासदार म्हणून उर्वरित तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचेही स्पष्ट केले. शरद पवारांनी हा निर्णय अचानक घेतला की गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मनात हा विचार सुरू होता, ही गोष्ट हळूहळू समोर येईल. शरद पवारांच्या या राजीनाम्याचा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल? आणि भाजपवर या निर्णयाचा काय परिणाम होईल? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.
राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांचा दर्जा भीष्म पितामहांचा आहे. ते देशाचे कृषिमंत्री आणि संरक्षण मंत्री राहिलेले आहेत. शिवाय देशाच्या राजकारणावर त्यांची पकड आणि विरोधी नेत्यांमध्ये त्यांची मान्यता सर्वांना परिचित आहे. पवारांना देशाच्या राजकारणाचं आकलन किती खोलवर आहे. याचं उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं होतं. काँग्रेसने विरोधी ऐक्यासाठी बैठका घेण्यास सुरुवात केली तेव्हा मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यासमोर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पवारांनी स्पष्ट केलं होतं की, भाजपला पराभूत करणं अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि के चंद्रशेखर राव यांना सोबत घेतल्याशिवाय शक्य आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यापासून ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि के चंद्रशेखर राव अशा बड्या नेत्यांनी अनेकदा पवारांशी चर्चा केली आहे.
ममता बॅनर्जी आणि केसीआर यांनी बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस आघाडी स्थापन करण्याची मोहिम सुरू केली तेव्हा शरद पवारांनी त्यांना देशात काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय भाजपला विरोधकांकडून आव्हान देता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले होते. शरद पवारांची ही राजकीय समज नितीशकुमार यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याला समजली आणि ते अरविंद केजरीवाल यांना भेटायला गेले आणि विरोधी ऐक्याचे प्रयत्न पुढे नेण्यास सुरुवात केली. पवार राजकारणात सक्रिय नसतील तर देशात विरोधक एकत्र येण्याची मोहीम आणखी कठीण होऊ शकते. महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ पूर्वी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येईल असे कोणालाही वाटले नसेल. पण शरद पवारांच्या पुढाकाराने ते घडलं आणि राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतरही हे तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांचं सरकार टिकेल का? असा सवाल अनेकांच्या मनात होता. परंतु महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी ते जोडून ठेवले. सत्ता गेल्यानंतरही महाविकास आघाडी भक्कमपणे वज्रमुठ करून भाजपशी लढत आहे. पण आता पवार राष्ट्रवादीची धुरा दुसऱ्या कुणाच्या खांद्यावर सोपवणार असतील तर महाविकास आघाडीचं काय होणार? आणि राष्ट्रवादीची पुढील वाटचाल नेमकी कशी असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.