उरण विधानसभा मतदारसंघात महायुतीविरोधात लढण्याऐवजी शेकाप आणि उद्धव सेनेतच जुंपल्याचं बघायला मिळतय. त्यामुळं याचा फायदा महेश बालदी यांना होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई : शिवसेना उद्धव बाळाबाहेब ठाकरे पक्षाकडून बुधवारी (23 ऑक्टोबर) रात्री 65 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात उरण विधानसभा मतदार संघातून (Uran Assembly Election 2024) मनोहर भोईर यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र, याच मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षानं देखील उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळं दोन्ही गटातील द्वंद्वाचा फायदा म्हणून भाजपाला बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आघाडीतील बिघाडीचा फायदा भाजपाला होणार? :
महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक असलेल्या शेतकरी कामगार पक्षानं उरण विधानसभा मतदारसंघात प्रितम म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळं महाविकासआघाडीत बिघाडी झाली आहे. तसंच शेकापच्या या निर्णयामुळं महाआघाडीची मतं वाटली जाणार असल्यानं याचा थेट फायदा भाजपाचे उमेदवार महेश बालदी यांना होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.
भोईर यांचं नाणं वाजणार? :
या मतदारसंघातील भाजपाचे आमदार महेश बालदी यांच्याविषयी असलेली नाराजी, विमानतळाला दि बा पाटील यांच्या नामांतराचा गाजत असलेला प्रश्न आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळं स्थानिकांमध्ये असलेली अस्वस्थता यामुळं ही निवडणूक भाजपाला सोपी नाही असंच चित्र होतं. परंतु, मविआच्या शेकाप आणि शिवसेनेतच (ठाकरे गट) जुंपल्यानं महेश बालदी यांचं काम काही प्रमाणात सोप्प झालंय. दरम्यान, मनोहर भोईर यांचा मागच्या निवडणुकीत फक्त 5 हजार 710 मतांनी पराभव झाला होता. हा पराभव भोईर यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळं पराभवाचा घोट पिल्यानंतर भोईर यांचं नाणं वाजणार का? याकडंही सर्वाचंच लक्ष लागलंय.