
न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रनं गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात शानदार शतक झळकावून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिलीय. रवींद्रनं जागतिक क्रिकेटच्या सर्वात मोठ्या मंचावर शानदार फलंदाजी करत 123 धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला इंग्लंडविरुद्ध 9 विकेट्सनं विजय मिळवून दिलाय.
अहमदाबाद- न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रनं आयसीसी विश्वचषक २०२३ च्या सलामीच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी करुन सर्वत्र आपलं नाव केलं. विश्वचषक 2023 च्या पहिल्याच सामन्यात रवींद्रनं शानदार शतक झळकावलंय. त्याच्या विश्वचषक कारकिर्दीतील हा पहिलाच सामना होता आणि त्यानं यात शानदार कामगिरी करत आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात त्यानं 123 धावांची नाबाद खेळी केली. यावेळी त्यानं डेव्हन कॉन्वेच्या साथीनं न्यूझीलंडला 9 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवून दिला.
रवींद्रचं रचिन हे नाव कसं पडलं
रचिन रवींद्र हे नाव ठेवण्यामागं एक रंजक कथा आहे. खरं तर त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्यानं राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या खेळाचं मिश्रण करत त्याच्यात दोघांचे गुण असावेत. म्हणून त्याच्या वडिलांनी राहूलचा ‘र’ आणि सचिनचा ‘चिन’ एकत्र करत त्यांनी त्याचं नाव रचिन ठेवलं. रचिन हा भारतीय वंशाचा किवी खेळाडू आहे. डाव्या हाताच्या या खेळाडूचा जन्म वेलिंग्टन इथं झाला. त्याचे आई-वडील कर्नाटकातील बंगळुरूचे रहिवासी आहेत आणि ते सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. रचिनचे आई-वडील न्यूझीलंडमध्ये स्थलांतरित झाले. रचिन त्याचे आई-वडील न्यूझीलंडला जाण्यापूर्वी त्याच्या मूळ गावी बंगळुरू इथं क्लब स्तरीय क्रिकेट खेळत होता.
भारताविरुद्धच पदार्पण
रचिन हा न्यूझीलंडसाठी युवा खेळाडू म्हणून उदयास येत आहे. कुरळे केस असलेल्या या खेळाडूनं न्यूझीलंड क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या 23 वर्षीय अष्टपैलू खेळाडूनं 2 वर्षांपूर्वीच न्यूझीलंड संघाकडून पदार्पण केलं होतं. त्यानं आतापर्यंत 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यानं कानपूर इथं भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात त्यानं हॅरी ब्रुकला त्याच्या पहिल्याच षटकात डेव्हन कॉन्वेकरवी झेलबाद करुन चाहत्यांची मनं जिंकली.