भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत जाहीर…

जनशक्तीचा दबाव न्यूज | बुलढाणा | एप्रिल २४, २०२३.
संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या बुलढाण्यातील भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत आज रविवारी जाहीर करण्यात आले आहे.
सकाळी सहा वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे. यंदा महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या पीक पावसाची स्थिती सांगताना जून महिन्यात पाऊस कमी असेल असं सांगण्यात आलं आहे. तर जुलैमध्ये साधारण आणि ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस असून अतिवृष्टीचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी असेल. मात्र अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे असं भाकीत सांगण्यात आलं आहे.
पावसाबाबत अंदाज?
जून महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे पेरणी उशिरा होईल.
जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे.
ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडणार असून, अतिवृष्टी देखील होईल.
सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल.
पण अवकाळी पाऊस भरपूर होणार असून, पिकांचे नुकसान होईल.
पीक पाण्यासंबंधीचे अंदाज…
यावर्षी पिकांवर रोगराई राहिल.
कापूस पीक मध्यम होईल, कापसात तेजी असेल.
ज्वारी सर्वसाधारण राहिल.
तूर पीक चांगले असेल.
मूग पीक सर्वसाधारण असेल.
उडीद मोघम सर्वसाधारण.
तीळ सर्वसाधारण मात्र नासाडी होईल.
बाजरी सर्व साधारण मात्र नासाडी होईल.
तांदुळाचं चांगलं पीक येईल.
गहू सर्वसाधारण बाजार भाव तेजीत राहिल.
हरभरा अनिश्चित कमी जास्त पीक येईल. मात्र नुकसान सुद्धा होईल.
देशासंबंधीचे अंदाज…
संरक्षण मजबूत राहिल, मात्र शेजारील राष्ट्राच्या कुरघोड्या असतील.
देशाची आर्थिक परिस्थिती खालावेल, चढउतार होईल.
राजकीय अंदाज…
राजा कायम आहे, पण राजाला अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच राजा कायम तणावात असेल.
राजकीय उलथापालथ होत राहिल.
नैसर्गिक आपत्ती येत राहतील, भूकंप प्रमाण जास्त असेल.
काय आहे भेंडवळ भविष्यवाणी???
पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्याची परंपरा आहे. गेल्या ३५० वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जात आहे. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येते. ३५० वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती, आणि आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत.