मुंबई ,26 जुलै- भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हीडीओ प्रकरणाचा तपास करणा-या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी हा व्हीडीओ खरा असल्याचा दावा केला आहे. तपास पथकाने या व्हीडीओचे विश्लेषण केले आणि तो मॉर्फ केलेला नसून खरा असल्याचे आढळले. मुंबई पोलिस आता हा व्हीडीओ व्हायरल कोणी केला याचा तपास करत आहेत.
किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हीडीओ एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केला होता. त्यांच्या या व्हायरल व्हीडीओचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला होता. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.
मुंबई क्राईम ब्रँचकडून तपास सुरू
यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट १० कडे सोपवण्यात आला असून त्यांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक आधारावर गुन्हे शाखेने संबंधित वृत्तवाहिनीशी संपर्क साधून व्हीडीओची मागणी केली. तपास यंत्रणेला किरीट सोमय्या यांचा व्हीडीओ मिळाल्यानंतर त्यांनी व्हीडीओचे विश्लेषण केले आणि तो व्हीडीओ खरे असल्याचे आढळल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.