
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत यश प्राप्त केले आहे. कॉँग्रेसला तर खाते देखील उघडता आलेले नाही. आम आदमी पक्षाला केवळ 22 जागा जिंकता आल्या.
दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाच्या पराभवाची प्रमुख कारणे …
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा दणदणीत यश प्राप्त केले आहे. भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकल्या आहेत. तर 10 वर्ष दिल्लीत सत्ता असणाऱ्या आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. कॉँग्रेसला तर खाते देखील उघडता आलेले नाही. आम आदमी पक्षाला केवळ 22 जागा जिंकता आल्या. दरम्यान आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा देखील पराभव झाला आहे. भाजप उमेदवार प्रवेश वर्मा हे नवी दिल्लीतून विजयी झाले आहेत. दरम्यान 10 वर्षे सत्ता असणाऱ्या आपचा दिल्लीत कशामुळे पराभव झाला, याची कारणे जाणून घेऊयात.
विद्यमान सरकारविरुद्ध असंतोष …
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या सरकारविरुद्ध दिल्लीत काहीशी नाराजी पाहायला मिळाली. नवी दिल्ली येथून निवडणूक लढणाऱ्या केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. नवी दिल्ली या भागात श्रीमंत ते गरीब अशा प्रत्येक वर्गातील नागरिक वास्तव्य करतात. दरम्यान यावेळेस सामान्य जनतेचा केजरीवाल आणि त्यांच्या पक्षावर विश्वास नसल्याचे पाहायला मिळाले. पाणी, वीज आणि अन्य सुविधा यांच्याबद्दल नाराजीचे चित्र दिसून आले.
मजबूत विरोधी पक्ष…
भाजपने नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध प्रवेश वर्मा यांना तिकीट दिले होते. प्रवेश वर्मा यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. कॉँग्रेसने माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना तिकीट दिले. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत शीला दीक्षित यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत सत्ता प्राप्त केली होती. मात्र या भागातील मतदारांनी आपला कौल प्रवेश वर्मा यांना दिल्याचे दिसून आले आहे.
मतदारांची नाराजी..
दिल्लीमध्ये एक विशिष्ठ वर्ग जो आम आदमी पक्षाचा कोअर मतदार म्हणून ओळखला जायचा. तो मतदार देखील केजरीवाल आणि आम आदमी पक्ष यांच्यावर नाराज दिसला. रोजगार, जीवनावश्यक सुविधा, दारू घोटाळा, पाणी, वीज असे मूलभूत प्रश्न सुटू न शकल्याने कोअर मतदार देखील नाराज झाला आणि त्याने आपले मत भाजपच्या पारड्यात टाकले.
भ्रष्टाचार आणि घोटाळे…
अरविंद केजरीवाल हे प्रामाणिक, इमानदारीचे राजकरण करणार असल्याचे सांगून सत्तेत आले. मात्र त्यांच्याच सरकारवर अनेक घोटाळे केल्याचे आरोप झाले. दारू घोटाळ्यात त्यांना तुरुंगात जावे लागले. अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या सर्व आरोपांचा देखील फटका मोठ्या प्रमाणात आम आदमी पक्षाला बसला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? …
हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीत भाजपने मोठे यश मिळवले आहे. दिल्लीच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस हे भाजपचे स्टार प्रचारक होते. त्यांनी अनेक उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. आज पुण्यातून बोलताना फडणवीस यांनी दिल्लीतील विजयावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दिल्ली विधानसभेवर 27 वर्षांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला गेला आहे. दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दिल्लीच्या जनतेने विश्वास ठेवला.”