दहशतवाद्यांच्या हल्ल्यावेळी पर्यटकांच्या रक्षणासाठी दहशतवाद्यांशी भिडला; मरण पत्करलं; काश्मिरी तरूण आदिल शाहच्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ५ लाखांची मदत; घरही बांधून देणार…

Spread the love

मुंबई- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह या अवघ्या 20 वर्षांच्या स्थानिक युवकाचा देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत केली.

पहलगाम येथे मदतीसाठी गेलेले शिवसेना कार्यकर्ते आणि सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सय्यदच्या कुटुंबीयांना धनादेश देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अवघ्या 20 वर्षाचा असलेला सय्यद आदिल पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचं काम करायचा. त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहलागमची सफर करत होता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी समोर आल्यानंतर सय्यद याने धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरममध्ये फिरायला गेलेले राज्यातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले होते.

त्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी 23 एप्रिल रोजी रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला. या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी सय्यद  आदिलने दाखवलेली माणुसकी आणि धाडसाबाबतचा अनुभव उपमुख्यमंत्र्यांना सांगितले. त्याची दखल घेत शिंदे यांनी सय्यद  आदिलच्या कुटुबीयांना तात्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला. सय्यद आदिलने बहादुरी दाखवत माणुसकीचे अनोखे उदाहरण जगासमोर दाखवून दिले आहे, त्याचे हौतात्म्य वाया जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शाह कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच सय्यद आदिलच्या कुटुंबाचे मोडकळीस आलेले घर नव्याने बांधून देण्यासाठी मदत करू, अशी ग्वाहीही शिंदे यांनी यावेळी दिली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page